नागपूर : महाविद्यालयीनस्तरावर विद्यार्थ्यांची गळती तसेच त्यांच्यातील कौशल्याचा अभाव ही विदर्भाच्या मागासलेपणाचे प्रमुख कारण असून, या समस्येवर मात करण्यासाठी विद्यापीठ तसेच लोकमतच्या पुढाकाराने स्थानिक संसाधनांच्या वापरातून रोजगारनिर्मिती करायला हवी. त्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धार सर्व प्रमुख कुलगुरूंच्या बैठकीत बुधवारी व्यक्त करण्यात आला.
लोकमतच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वैदर्भीय तरुणांच्या रोजगारविषयक संधींबद्दल चर्चा करण्यासाठी नागपूर येथे विद्यापीठांच्या कुलगुरूंची एक बैठक घेण्यात आली. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर व सहकारी डॉ. वकार खान, अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डाॅ. विलास खर्चे व फलोत्पादन विभागाचे नितीन गुप्ता, लोकमतचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, लोकमत टाइम्सचे संपादक एन. के. नायक, सहायक उपाध्यक्ष मतीन खान या बैठकीला उपस्थित होते. राज्याचे माजी वित्तमंत्री तथा विधिमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार प्रकृतीच्या कारणाने बैठकीला येऊ शकले नाही. त्यांनी भ्रमणध्वनीवर त्यांची मते व्यक्त केली. त्यांचे सहकारी नितीन कुलकर्णी उपस्थित होते.
शेकडो महाविद्यालये आणि लाखो विद्यार्थ्यांशी थेट रोजचा संबंध असलेल्या कुलगुरूंकडून विदर्भाच्या समस्या व भविष्यातील आव्हाने समजून घेता आली. महाविद्यालयीनस्तरावरील विद्यार्थ्यांची गळती, तसेच तरुणांमधील क्षमतांचा अभाव या मोठ्या समस्या आहेत. त्यांचे निराकरण करण्यासाठी शालेयस्तरावरून प्रयत्न करावे लागतील. विद्यापीठ, शैक्षणिक संस्था व लोकप्रतिनिधींच्या मदतीने लोकमत समस्याग्रस्त विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करील. लोकमतच्या नागपूर आवृत्तीचा सुवर्ण महोत्सव आणि लोकमतचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांचे येत्या २ जुलैपासून सुरू होणारे शताब्दी वर्ष यानिमित्ताने त्या प्रयत्नांना सुरुवात करता येईल.
- विजय दर्डा, चेअरमन, लोकमत एडिटोरियल बोर्ड तथा माजी खासदार, राज्यसभा
विदर्भाचा विकास आणि जनमानसाप्रती जागरूक लोकमतने सर्व विद्यापीठे तसेच शैक्षणिक क्षेत्राला सोबत घेऊन सर्वांगीण विकासासाठी कृतिशील पाऊल उचलणे अत्यंत स्वागतार्ह आहे. शिक्षण हा मानवी विकासाचा पाया असल्याने लोकप्रतिनिधी म्हणून या दिंडीचा वारकरी म्हणून आपण सोबत असू. खूप काही करण्यासारखे आहे. यासंदर्भात काही काम झाले आहे आणि बरेच बाकी आहे. विदर्भातील सर्वच राजकीय नेतेदेखील सोबत असतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
- सुधीर मुनगंटीवार, माजी वित्तमंत्री, महाराष्ट तथा अध्यक्ष, विधिमंडळ लोकलेखा समिती
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ हे सागर, जबलपूर, अमरावती, गाेंडवाना अशा मध्य भारतातील सगळ्याच पारंपरिक विद्यापीठांची मातृसंस्था असल्याने, प्रदेशाच्या शाश्वत विकासाची मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. तथापि, स्थानिक संसाधनांच्या वापरातूनच रोजगार निर्मिती व उद्योजकतेची मानसिकता घडविली जाऊ शकेल. येत्या ४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. पाचशेहून अधिक महाविद्यालये आणि चार-साडेचार लाख विद्यार्थ्यांचे गावपातळीवरील नेटवर्क उपलब्ध आहे. लोककलांचे सांस्कृतिक माध्यम वापरण्याचे नियोजन झाले आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान २५ विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे विद्यापीठाच्या खर्चाने प्रशिक्षण देण्याची योजना राबविली जात आहे.
- डॉ. सुभाष चौधरी, कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर
पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे केवळ १७ टक्के विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात पदवी मिळवितात. उरलेल्या ८३ टक्के विद्यार्थ्यांची काळजी मोठी आहे. तसेही केवळ ३० टक्के विद्यार्थीच एकूण पदवीचा उंबरठा ओलांडतात. उरलेल्या ७० टक्क्यांची गळती कमी करण्यासाठी आणि महाविद्यालयीन शिक्षणात संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी संत गाडगेबाबा विद्यापीठ गेले काही महिने एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करीत आहे. विशेषत: पदवी शिक्षणाचेही सार्वत्रिकीकरण करण्यासाठी अभ्यासक्रमात कौशल्यविकास, प्रकल्पावर काम आणि रोजगारक्षम उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल.
- डॉ. दिलीप मालखेडे, कुलगुरू, संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा पशुपालन व दुग्धव्यवसाय, मासेमारी याशिवाय साकारूच शकत नाही. त्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यविकासात महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावू शकते. विदर्भातील दूध उत्पादन वाढविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शंभर तालुक्यांमध्ये विद्यापीठाने हाती घेतला आहे. रोजगाराच्या कितीतरी संधी या क्षेत्रात आहेत. महत्त्वाचे म्हणजे हा रोजगार ग्रामीण, आदिवासी भागातच नव्हे तर पाळीव प्राण्यांची देखभाल, शुश्रूषा आदींच्या माध्यमातून शहरांमध्येही उभा राहू शकतो.
- डॉ. आशिष पातूरकर, कुलगुरू, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर
खूप मोठ्या स्वप्नांमागे विद्यार्थ्यांना धावायला लावून नंतर अपयशामुळे येणारे नैराश्य टाळायचे असेल तर सहज शक्य अशा कौशल्यविकासावर काम व्हायला हवे. केंद्र व राज्यातील स्पर्धा परीक्षांसोबतच विद्यार्थ्यांना छोटे-छोटे कोर्सेस शिकविण्याची गरज आहे. आदिवासी जिल्ह्यांमधील मागास विद्यार्थ्यांची काळजी घेणाऱ्या गोंडवाना विद्यापीठाने चार्टर्ड अकाउंटंट संघटनेच्या मदतीने नियमित शिक्षणासोबत टॅली प्रशिक्षण सुरू केले आहे. त्यावर विद्यापीठ खर्च करीत आहे. त्याशिवाय केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी दिल्लीहून तज्ज्ञ प्रशिक्षक बोलावले जात आहेत.
- डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरु, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शेतीशिवाय इतर क्षेत्रात संधी मिळाव्यात यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने राहुरीच्या धर्तीवर अकोल्यात स्पर्धात्मकता फोरम सुरू केला आहे. चांगली अभ्यासिका, मोठे सभागृह आहे. आता त्याच्या शाखा प्रत्येक जिल्ह्यात उघडण्याचा प्रयत्न आहे. विद्यापीठाचे विविध विभाग आणि कार्यक्षेत्रातील २६ महाविद्यालयांच्या माध्यमातून विदर्भातील शेतीविकास व शेतकऱ्यांच्या मुलांसाठी करिअरच्या नवनव्या संधी निर्माण करण्यासाठी खूप काही केले जाऊ शकते. लोकमत त्यासाठी पुढाकार घेत असल्याने एक व्यापक अभियान राबविले जाऊ शकेल.
- डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला