नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) योगेश कुंभेजकर यांची भंडारा येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी बुलढाणा जि.प.च्या सीईओ भाग्यश्री विसपुते रुजू होणार आहेत.
कोविडचा संक्रमण काळात कुंभेजकर यांनी सीईओ पदाचा कारभार हाती घेतला. त्यांनी जिल्ह्यात कोविड प्रादुर्भाव आटोक्यात राहावा यासाठी विशेषत्वाने प्रयत्न केले. या काळात त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासमवेत जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात राहण्यासोबतच नागरिकांनीही कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे यासाठी गावांना भेटी करून नागरिकांमध्ये जनजागृती केली. प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नतीसह विविध विषय मार्गी लावण्याचा इतिहास रचला. तसेच चुकीला माफी नाही, या धोरणाचा अवलंब करत त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनासोबतच वेतनवाढ रोखण्याच्यादेखील शेकडो कारवाया केल्या. त्यांनी झिरो पेन्डेंसीचा अवलंब केला. जि.प.चे सर्व कामकाज ऑनलाईन ट्रॅकिंग प्रणालीशी जोडले. यामुळे कुठली फाईल, कुठल्या टेबलवर किती दिवस राहिली याची संपूर्ण माहिती मिळते. त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर दिला. मनरेगासह १५ व्या वित्त आयोग आणि विविध निधींतून त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगची हजारो कामे हाती घेतली. यांतील काही कामे पूर्णही झालेली आहेत.
शीतल उगले यांची सोलापूरला बदली
नागपूर येथील वस्त्रोद्योग मंडळाच्या संचालक शीतल उगले-तेली यांची सोलापूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.