नागपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्र सुसूत्रीकरण व पुनर्रचना कार्यक्रम सुरू आहे. सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना त्यांच्या अधिकृत ई-मेल वर यासंदर्भातील प्रारूप यादी पाठविण्यात आली आहे. यामध्ये राजकीय पक्षांनी वस्तुनिष्ठ आक्षेप सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले.
ब्लॉक व तालुका स्तरावरील राजकीय पक्षांच्या बैठकांनंतर जिल्ह्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसोबत आज जिल्हा निवडणूक विभागाने सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १२ विधानसभा क्षेत्रासंदर्भात चर्चा केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहामध्ये झालेल्या या बैठकीला १२ विधानसभा क्षेत्राचे निवडणूक प्रभारी उपस्थित होते. तसेच रमेश दलाल प्रकाश बारोकर, बंडोपंत टेंभुर्णे, सचिन तिरपुडे, किशोर गजभिये, सचिन मठाले, प्रवीण शर्मा, शुभम नवले यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाच्या संदर्भात दीड हजारापेक्षा जास्त मतदार असतील अशा केंद्रासंदर्भात आवश्यक बदल व अन्य बाबी मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या लक्षात आणून देण्याबाबतची सूचना केली होती. या बैठकीत या संदर्भातील प्रारूप तयार असल्याचे सांगण्यात आले. तसेच काही सुधारणा असल्यास सुचविण्याची विनंती निवडणूक विभागामार्फत करण्यात आली. उप निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी यावेळी बैठकीचे संचालन केले.