नागपूर : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्यावतीने दाभा येथे चालविण्यात येणारे वसतीगृह चिंचभवनला स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात विद्यार्थ्यांनी उपोषणाचे शस्त्र उगारले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसतीगृह देण्याची मागणी करीत एका टोकावर कॉलेज अन् दुसऱ्या टोकावर वसतीगृह कसे चालेल, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.
दाभा व दिघोरी येथे भाड्याच्या इमारतीत समाज कल्याणचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांचे वसतीगृह आहे. ही दोन्ही वसतीगृहामध्ये पावसाळ्यात पाणी साचते. तळमजल्यावर असलेल्या भोजनगृहात पाणी साचत असल्याने मुलांना त्रास होतो. त्यामुळे दोन्ही वसतीगृह चिंचभवनला स्थानांतरित करण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. याला विद्यार्थ्यांनी विरोध केला व उपोषण सुरू केले.
विद्यार्थ्यांच्या मते याच भागात दुसऱ्या वसतीगृहातही हीच समस्या असताना त्याला स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. शिवाय चिंचभवनचे वसतीगृह निर्जन स्थळी असल्याने सुरक्षेचा प्रश्नही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. अनेक विद्यार्थ्यांची महाविद्यालये काटोल नाका परिसरात आहेत. शिक्षणासोबत कौशल्य विकासाचे कोर्सेसही करावे लागतात. दुसऱ्या टोकाच्या वसतीगृहात गेल्यास विद्यार्थ्यांना प्रवासाचा खुप जास्त त्रास होईल, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे एकतर आहे त्याच भागात किंवा शहराच्या मध्यवर्ती भागात वसतीगृह द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे दिघोरी व बहादूरा येथील इमारत सुद्धा चिंचभवन, खापरी नाका येथे स्थलांतरित करण्याचा आदेश आहे. त्याऐवजी दिघोरी परिसरातच मोठी इमारत समाज कल्याण का घेत नाही, असा विद्यार्थ्यांचा सवाल आहे.