आशिष दुबे नागपूर राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेकडो विद्यार्थी अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे, ही चूक मान्य करण्याऐवजी अधिकाऱ्यांनी या चुकीचे खापर मृत कर्मचाऱ्यावर फोडले आहे. विद्यापीठाचे परीक्षा सत्र सुरू होणार असून, परीक्षार्थ्यांना प्रवेश पत्र वितरीत करण्यात आले आहे. हे प्रवेश पत्र पाहून नागपुरातील ३० महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जबर धक्का बसला आहे. कारण या विद्यार्थ्यांना नागपूरच्या जवळपास नव्हे तर जिल्ह्याबाहेर परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना त्याची तक्रारवजा माहिती दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यावर त्यांना सकारात्मक उत्तर मिळाले नाही. परीक्षा पुढ्यात असल्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने प्रभारी कुलपती डॉ. विनायक देशपांडे, प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्यासह परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिले. त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, ३० पैकी १० महाविद्यालये अशी आहेत, की ज्यातील विद्यार्थ्यांना काटोल, सावनेर, कळमेश्वर आदी तालुक्यात परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. काहींना वर्धा तर काहींना भंडाऱ्याला परीक्षा केंद्र मिळाले आहे.
कॉलेज नागपुरात परीक्षा केंद्र भंडाऱ्यात
By admin | Published: March 18, 2015 2:51 AM