नागपूर : कृषी महाविद्यालयाने आपली तब्बल ६९८० चौरस मीटर जागा मेट्रो भवनाची पार्किंग व इतर कामासाठी महामेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. नागपूर यांना विनामूल्य हस्तांतरित केली आहे. या जागेच्या मोबदल्यात महामेट्रो कृषी महाविद्यालयाला स्नानकोत्तर मुलांसाठी ८० खोल्यांचे आणि स्नातकपूर्व विद्यार्थ्यांच्या १५० खोल्यांचे असे दोन वसतिगृह बांधून देणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आली आहे.
नागपूर शहरात महामेट्रोचे जाळे विस्तारत आहे. पहिला टप्पा जवळपास पूर्ण होत आला असून दुसऱ्या टप्प्यालाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे जागेची आवश्यकता निर्माण झाली आहे. महामेट्रोचे मुख्यालय असलेल्या मेट्रो भवन परिसरातही पार्किंग व इतर कामांसाठी जागेची गरज आहे. त्यासाठी मेट्रोने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयाची मौजे लेन्ड्रा येथील खसरा क्रमांक २१७ पैकी नगर भूमापन क्र.१२६१, शिट क्रमांक ६१ आराजी १३०३७९.०० चौ.मी. जागेपैकी पैकी ६९८० चौ.मी.जमीन विनामोबदला हस्तांतरित करण्याची विनंती कृषी विद्यापीठाला केली होती. परंतु ही जागा नवीन स्नातकपूर्व व स्नातकोत्तर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी आवश्यक असल्याने कृषी विद्यापीठाने तेव्हा जमीन देण्यास नकार दिला. मात्र मुख्यमंत्र्यांनी यात मध्यस्ती करीत मार्ग काढला. त्यानुसार कृषी महाविद्यालय ही जागा मेट्रोला देईल आणि त्या मोबदल्यात मेट्रो दोन्ही वसतिगृहाचे बांधकाम करून देईल. या अटीवरच कृषी विद्यापीठाने ही जागा मेट्रोला हस्तातंरित केली आहे.