योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया सुरू असून दरवर्षीप्रमाणे यंदादेखील महाविद्यालयांना रिक्त जागांची चिंता सतावत आहे. ‘कॅप’च्या प्रथम फेरीला सुरुवात होण्याअगोदरच काही महाविद्यालयांनी चक्क जागांचा ‘सेल’च मांडला आहे. विद्यार्थ्यांना कमी शुल्कात प्रवेश देण्याच्या ‘ऑफर्स’ देण्यात येत आहेत व त्यांच्याकडून कागदपत्रे अगोदरच घेण्यात येत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शहरातील काही महाविद्यालयांकडून असे प्रकार सुरू असून यासाठी ‘एजंट्स’देखील नेमण्यात आले आहेत.काही वर्षांपासून सातत्याने अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहत आहेत. शहरातील काही महाविद्यालये सोडली तर इतर ठिकाणी रिक्त जागांचे प्रमाण जास्त आहे. यातील काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी वेगळाच प्रकार सुरू केला आहे. अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याअगोदरच त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी संपर्क केला. बाहेरील राज्यातदेखील त्यांनी ‘एजंट्स’च्या माध्यमातून ‘नेटवर्क’ प्रस्थापित केले. एरवी अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गात साधारणत: ८० हजारांच्या आसपास शुल्क द्यावे लागते. मात्र या महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना ‘ऑफर्स’ देणे सुरू आहे. अर्धे शुल्कच द्या व प्रवेश घ्या, असे विद्यार्थी व पालकांना सांगण्यात येत आहे. याशिवाय वसतिगृहात राहण्याच्या व जेवण्याच्या खर्चातदेखील भरमसाठ सूट देण्याचे आमिष दाखविण्यात येत आहे. एका महाविद्यालयातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार काही ठिकाणी तर केवळ आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांचेच अशा प्रकारे प्रवेश घेण्यात येत आहेत व त्यांनादेखील अशाच ‘आॅफर्स’ देण्यात येत आहेत.
चांगल्या महाविद्यालयांचे दरवाजे बंदएका महाविद्यालयाने बारावीचा तसेच ‘एमएचटी-सीईटी’चा निकाल लागण्याअगोदरच गोंदिया जिल्हा तसेच मध्य प्रदेशमधील काही विद्यार्थ्यांची कागदपत्रे अगोदरच ठेवून घेतली. यातील काही विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले. परंतु कागदपत्रेच अगोदर दिल्याने चांगल्या व दर्जेदार महाविद्यालयांतील प्रवेशाचे त्यांचे दरवाजे बंद झाले आहेत.
...मग जेवणात मिळतो मसालेभातप्रवेशासाठी ‘ऑफर्स’ देणाऱ्या महाविद्यालयातील एका प्राध्यापकाशी संपर्क केला असता त्याने धक्कादायक माहितीच दिली. वसतिगृहात राहणे व खाण्याच्या शुल्कात सूट देण्यात येते. मात्र महाविद्यालय सुरू झाल्यानंतर आठवड्यातील तीन ते चार दिवस विद्यार्थ्यांना केवळ मसालेभातच देण्यात येतो. विद्यार्थी याबद्दल मग दाददेखील मागण्यास घाबरतात.