नागपूर विद्यापीठ : किमान शिक्षक नियुक्तीसंदर्भात नवीन अधिसूचना जारीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांत किमान नियमित शिक्षक नेमणुकीसंदर्भात नवीन अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना आता ५० टक्के शिक्षक नियुक्तीकरिता ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासोबतच विद्यार्थ्यांचे नामांकन अर्ज सादर करताना महाविद्यालयांना हमीपत्र सादर करण्याचेदेखील निर्देश ‘बीसीयूडी’(बोर्ड आॅफ कॉलेज अॅन्ड युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट) संचालकांकडून देण्यात आले आहेत.२०१४-१५ या शैक्षणिक सत्रात प्रवेशासाठी महाविद्यालयांत मंजूर क्षमतेच्या ५० टक्के पूर्णकालीन शिक्षकांची ५ आॅगस्टपूर्वी नियुक्ती करण्याची अट विद्यापीठाने लावली होती. पारंपरिक, व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सर्व महाविद्यालयांना ही अट होती. परंतु महाविद्यालयांना जाचक ठरणाऱ्या या अटींवर फेरविचार करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी विद्यापीठ प्राधिकरणांतील सदस्य, महाविद्यालये, प्राचार्य व टीचर्स फोरम इत्यादींकडून करण्यात आली. त्यानुसार यासाठी डॉ. बबन तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. या समितीने आपला अहवाल मागील आठवड्यात विद्यापीठाकडे सादर केला. विद्वत परिषदेद्वारा प्रदान करण्यात आलेले अधिकार तसेच महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम १४ अंतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करून प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी गुरुवारी समितीच्या शिफारशींना मान्यता दिली. यासंदर्भात ‘बीसीयूडी’ संचालक डॉ. श्रीकांत कोमावार यांनी सायंकाळी अधिसूचना जारी केली.या अधिसूचनेनुसार सर्व संलग्नित व्यावसायिक व अव्यावसायिक महाविद्यालयांसाठी आवश्यक असलेल्या शिक्षकांपैकी ५० टक्के पूर्णकालीन शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक ठेवण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक विद्याशाखेत शिक्षकांची नियुक्ती करून विद्यापीठाची मान्यता प्राप्त करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर काही अपरिहार्य कारणास्तव महाविद्यालयाला ३१ आॅक्टोबरपर्यंत ५० टक्के आवश्यक शिक्षक नियुक्ती करणे शक्य झाले नाही तर कुलगुरू वेळ वाढवून देऊ शकतील.(प्रतिनिधी)अधिसूचनेतील प्रमुख अटी५० टक्के पूर्णकालीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी.उर्वरित शैक्षणिक भाराची पूर्तता करण्यासाठी सर्व महाविद्यालयांनी तासिका तत्त्वावर योग्यताप्राप्त शिक्षकांची नियुक्ती करावी.स्थापनेला ५ वर्ष पूर्ण न झालेल्या महाविद्यालयांना अट लागू नसेल. अशा महाविद्यालयांना किमान पूर्णकालीन प्राचार्य किंवा कार्यभार पूर्ण होत असल्यास किमान एका पूर्णकालीन विद्यापीठ मान्यताप्राप्त शिक्षकाची नियुक्ती करणे आवश्यक राहील.अटींची पूर्तता करण्याची संपूर्ण जबाबदारी संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांचीविद्यार्थ्यांचे नामांकन अर्ज विद्यापीठात सादर करीत असताना अटींचे पालन करत असल्याचे हमीपत्र दाखल करणे.३१ आॅक्टोबरपर्यंत पूर्णवेळ मान्यताप्राप्त शिक्षकांची यादी विद्यापीठाला सादर करणे बंधनकारक राहील.
महाविद्यालयांना ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ
By admin | Published: July 25, 2014 12:45 AM