लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तरुणांना देशभक्तीची शिकवण देणारे आणि जागरूक नागरिक घडवणारे प्रहार संघटनेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी शमा देशपांडे, मुली सोनाली देशपांडे ऊर्फ स्नेहल महाजन, फ्लार्इंग आॅफिसर शिवानी देशपांडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.गेल्या १० एप्रिल रोजी त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. रविवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना धंतोली येथील स्पंदन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. सोमवारी त्यांच्यावर अॅन्जीओग्राफी करण्यात आली. गुरुवारी त्यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी झाली. मात्र शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी ११४ पांडे ले-आऊट खामला येथील त्यांच्या निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघेल.प्रसिद्ध सिने अभिनेते नाना पाटेकर यांच्या १९९१ मध्ये आलेला ‘प्रहार’ या चित्रपटापासून प्रेरित होऊन कर्नल सुनील देशपांडे यांनी नोकरी सोडून प्रहार नावाची सैन्य अकादमी सुरू केली. ते माजी कमांडो प्रशिक्षक आणि महाराष्ट्र लाईट इन्फ्रेंट्री बटालियनमध्ये कमांडिंग आॅफिसर होते. त्यांची शेवटची पोस्टिंग बेलगाम कमांडो प्रशिक्षण केंद्रात होती. १९७१ च्या युद्धात कर्नल देशपांडे यांना विशिष्ट सेवा पदक मिळाले होते. प्रहार ही एक संस्था आहे. शाळा, महाविद्यालयांमधील तरुण विद्यार्थ्यांमध्ये प्रकृतीबद्दल, निसर्गाबद्दल प्रामाणिकपणा , सैनिकी मानसिकता, देशभक्ती यासारखे गुण निर्माण करण्याकरिता कर्नल सुनील देशपांडे यांनी नागपुरात प्रहार संघटनेची स्थापना केली. प्रा. मोहन गुजर यांनी प्रहारची उपशाखा वर्धेला सुरू केली. प्रहार ही तरुण विद्यार्थ्यांमध्ये सैनिकी मानसिकता तयार करतेच सोबतच प्रशिक्षण शिबिरेही आयोजित करते. त्या प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय अखंडता, मौलिकाधिकार, आदर्श नागरिक, शहरी सुरक्षितता, देखरेख, घोडेस्वारी, जंगल भटकंती, पर्वतारोहण इत्यादींचे प्रशिक्षण दिल्या जाते. त्यांच्या प्रहार या संस्थेद्वारे प्रशिक्षण घेऊन आजवर २५० हून अधिक तरुण-तरुणींची सैन्य दलात अधिकारी म्हणून निवड झाली आहे.राष्ट्रभक्त युवकांची फौज तयार करणारे ‘कर्नल’‘प्रहार’ या संघटनेमार्फत राष्ट्रभक्त युवकांची फौज तयार करण्यासाठी पुढाकार घेणारे कर्नल सुनील देशपांडे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर पुढच्या पिढीवर राष्ट्रभक्तीचे संस्कार करण्यासाठी कर्नल सुनील देशपांडे यांनी घेतलेला पुढाकार अतिशय उल्लेखनीय होता. ‘प्रहार’ या चित्रपटाची निर्मिती झाली, तेव्हा सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना सैनिकी बाबतीत संपूर्ण सहकार्य त्यांनी केले आणि त्यातूनच आपल्या संघटनेचे नावही त्यांनी ‘प्रहार’ असेच ठेवले. सैनिकी प्रशिक्षणावर आधारित शाळा, विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि कार्यशाळा इत्यादींच्या माध्यमातून त्यांनी सतत संस्कार करण्याचे काम केले. या माध्यमातून आणि त्यांच्या प्रेरणेतून अनेक तरुण भारतीय सैन्यात दाखल झाले. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आप्त, मित्र आणि कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीदेशभक्तीची प्रेरणा देणारा मार्गदर्शक हरवलाप्रहार संघटनेच्या माध्यमातून तरुणांना देशभक्तीची शिकवण देणारे सोबतच त्यांना जागरुक नागरिक म्हणून घडविणारे मार्गदर्शक म्हणून कर्नल सुनील देशपांडे यांची संपूर्ण देशात ओळख होती. त्यांच्या निधनाने एक मार्गदर्शक हरवला आहे. देशाच्या संरक्षणाशाठी अनेक देशभक्त तरुण त्यांनी घडविले. देशाच्या संरक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहीद जवानंच्या कुटुंबीयांची त्यांनी काळजी घेतली. शेवटच्या श्वासापर्यंत केवळ देशच नाही तर समाजाच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या कर्नल सुनील देशपांडे यांच्या निधनाने देशाचे व समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री
प्रहार संघटनेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:07 PM
तरुणांना देशभक्तीची शिकवण देणारे आणि जागरूक नागरिक घडवणारे प्रहार संघटनेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केलेराष्ट्रभक्त युवकांची फौज तयार करणारे ‘कर्नल’ १० एप्रिल रोजी साजरा केला ७५ वा वाढदिवस