नागपूर - प्रहार सामाजिक संघटनेचे कर्नल सुनील देशपांडे यांचे आज निधन झाले. 1971 च्या युद्धात त्यांना विशिष्ट सेवा पदक मिळाले होते. तसेच त्यांच्या संस्थेद्वारे प्रशिक्षण घेऊन आजवर 250 हून अधिक तरुण तरुणींची सैन्य दलात अधिकारी म्हणून निवड झाली आहे. दोन दिवसांपूर्वी कर्नल देशपांडे यांना हदयविकाराचा झटका आला होता. काल स्पंदन हॉस्पिटलमध्ये त्यांची ओपन हार्ट सर्जरी झाली होती. मात्र आज सायंकाळच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. कर्नल सुनील देशपांडे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख ‘प्रहार’ या संघटनेमार्फत राष्ट्रभक्त युवकांची फौज तयार करण्यासाठी पुढाकार घेणारे कर्नल सुनील देशपांडे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे.सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर पुढच्या पिढीवर राष्ट्रभक्तीचे संस्कार करण्यासाठी कर्नल सुनील देशपांडे यांनी घेतलेला पुढाकार अतिशय उल्लेखनीय होता. ‘प्रहार’ या चित्रपटाची निर्मिती झाली, तेव्हा सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना सैनिकी बाबतीत संपूर्ण सहकार्य त्यांनी केले आणि त्यातूनच आपल्या संघटनेचे नावही त्यांनी ‘प्रहार’ असेच ठेवले. सैनिकी प्रशिक्षणावर आधारित शाळा, विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि कार्यशाळा इत्यादींच्या माध्यमातून त्यांनी सतत संस्कार करण्याचे काम केले. या माध्यमातून आणि त्यांच्या प्रेरणेतून अनेक तरुण भारतीय सैन्यात दाखल झाले. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आप्त, मित्र आणि कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.
कर्नल सुनील देशपांडे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 9:59 PM