लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विभागीय आयुक्त कार्यालय, महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ५ ते ७ जानेवारीदरम्यान कालिदास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कवी कुलगुरू कालिदास यांच्या ‘विक्रमोर्वशीयम’ या विषयावर महोत्सवाची संकल्पना आहे. ५ जानेवारीला कविवर्य सुरेश भट सभागृह येथे सायंकाळी ६ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्यातील कॅबिनेट मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याउपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, यानिमित्ताने नागपूरकर रसिकांना पुन्हा एकदा मातब्बर कलावंतांच्या शास्त्रीय संगीत, गायन व नृत्याची मेजवानी मिळणार आहे. विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत महोत्सवाबाबत माहिती दिली. तीन दिवसाच्या महोत्सवात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताना आमंत्रित करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सुकीर्ती उईके या स्थानिक कलावंताचे शास्त्रीय गायन होईल; त्यानंतर अरुपा लाहिरी यांचे भरतनाट्यम आणि त्यानंतर प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या शास्त्रीय गायनाचा आनंद रसिकांना मिळेल. दुसऱ्या दिवशी ६ जानेवारीला सप्तकच्या सहकार्याने पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यापाच तत्त्वावर आधारित पंचतत्त्व हा स्थानिक कलावंतांची नृत्यनाटिका सादर होईल. रेणुका देशकर यांची संकल्पना आहे. या कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन स्वाती भालेराव तर संगीत शैलेष दाणी यांचे राहणार आहे. यात विशेष सहभाग वैद्य मृणाल जामदार, संदीप शिरखेडकर व डॉ. मुरकुटे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमानंतर समन्वय सरकार यांचे सतार वादन व त्यानंतर नृत्यांगना अभिनेत्री शर्वरी जमेनिस यांच्या कथ्थक नृत्याचा आस्वाद रसिकांना मिळणार आहे. ७ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता आदित्य खांडवे यांचे शास्त्रीय गायन व त्यानंतर सुश्री मोहंती यांची ओडिसी नृत्य व प्रसिद्ध सुफी गायिका नूरान भगिनी यांच्या सुफी गायनाची मेजवानी मिळणार आहे. तीनही दिवस सुरुवातीच्या सत्रात स्थानिक कलावंतांना संधी देण्यात आली आहे. रसिकांसाठी बससेवेची सोयशहरातील संगीत रसिकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा म्हणून शहरातील विविध भागातून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रम संपल्यावर परत जाण्यासाठीही ही व्यवस्था असेल. दुपारी ४.३० ते ६ या वेळेत बसेस सुटतील. स्वावलंबीनगर, पारडी, कळमेश्वर, हजारी पहाड, कोराडी, पिपळा फाटा आणि बेसा या ठिकाणाहून बसेस सुटणार आहेत. शिवाय ओला आणि उबेरची व्यवस्था सभागृहापासून करण्यात आली आहे.
नागपुरात पुन्हा चढेल कालिदास महोत्सवाचा रंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 12:41 AM
विभागीय आयुक्त कार्यालय, महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ५ ते ७ जानेवारीदरम्यान कालिदास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे५ ते ७ जानेवारीला आयोजन : महेश काळे, शर्वरी जमेनिस, नूरान सिर्स्टसच्या सादरीकरणाची रसिकांना मेजवानी