लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि दिल्ली पब्लिक स्कूल, कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे शानदार सादरीकरण केले. याद्वारे उपस्थित श्रोत्यांमध्ये देशभक्तीचा जोश भरला. दमक्षे सांस्कृतिक केंद्र परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ७३ व्या स्वातंत्र्य दिनाचे रंग या कार्यक्रमात उधळण्यात आले. कार्यक्रमाच्या उद््घाटनप्रसंगी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, प्रसिद्ध भरतनाट्यम कलावंत माडखोलकर, न्यूरोलॉजिस्ट डॉ. शैलेश केळकर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. आरती केळकर, दमक्षे केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, केंद्राचे उपसंचालक मोहन पारखी, दिल्ली पब्लिक स्कूलच्या प्राचार्या रितू शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते. एकल तबला वादनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. ‘रेल चली आझादी की रेल चली’ या संकल्पनेवर आधारीत देशभक्तीच्या रंगात रंगलेल्या या विशेष कार्यक्रमात गायन, वादन व नृत्याच्या शानदार सादरीकरणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून देशातील विविध राज्यांच्या संस्कृतीची झलक यावेळी दर्शविली. कार्यक्रमात डीपीएसच्या २०० विद्यार्थ्यांनी १० वेगवेगळ्या कलाकृतींचे सादरीकरण केले. यामध्ये गायन, नृत्य व लघुनाट्याच्या माध्यमातून देशाची अनोखी छटा दिसून आली. कार्यक्रमात बँडचेही सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने पालक व श्रोते उपस्थित होते.
नागपुरात स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला देशभक्तीचा रंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 12:08 AM
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि दिल्ली पब्लिक स्कूल, कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे शानदार सादरीकरण केले.
ठळक मुद्दे२०० विद्यार्थ्यांचे रंगारंग सादरीकरण : दमक्षे सांस्कृतिक केंद्राचे आयोजन