लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : बँक खातेदाराने देवलापार (ता. रामटेक) येथील एटीएममधून २५ हजार रुपयाची उचल केली. त्यात त्यांना ५०० रुपयाच्या तीन नाेटा रंग लागलेल्या व अर्धवट जळलेल्या प्राप्त झाल्या. या नाेटा कुणीही स्वीकारायला तयार नसल्याने त्यांचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकाराचा फटका बँक खातेदाराला बसला आहे.
देवलापार येथे बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. कृष्णा भाल, रा. बेलदा, ता. रामटेक यांनी शनिवारी (दि. २३) दुपारी या एटीएममधून २५ हजार रुपयाची उचल केली. मशीनमधून प्राप्त झालेल्या नाेटा त्यांनी निरखून बघितल्या असता, त्यातील ५०० रुपयाची एक नाेट रंगाने माखली हाेती तर, दुसरी नाेट कुजलेली आणि तिसरी नाेट अर्धवट जळालेली हाेती. त्यांनी पुरावा म्हणून या खराब तिन्ही नाेटा एमटीएम रूमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमाेर दाखविल्या.
या १,५०० रुपये किमतीच्या तीन नाेटा कुणीही स्वीकारायला तयार नसल्याने त्या द्यायच्या कुणाला, असा प्रश्न त्यांच्यासमाेर निर्माण झाला आहे. या व इतर कारणांमुळे खराब झालेल्या नाेटा दुकानदार, व्यापारी, पेट्राेल पंपवाल्यांसह बँक कर्मचारीही स्वीकारत नाही. त्यामुळे या प्रकारामुळे बँक खातेदाराला आर्थिक फटका सहन करावा लागताे. दुसरीकडे, मशीनमध्ये नाेटा टाकणाऱ्यांनी त्यांच्याकडील खराब नाेटा त्यात टाकून चांगल्या नाेटा काढून घेतल्या असाव्यात, अशी शक्यता काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे.