आवळेनगरातील रहिवासी मोहित खंडारेचा भाऊ मुकुल याचा शनिवारी जन्मदिवस होता. त्या अनुषंगाने मोहितने घरी छोटासा पार्टीचा कार्यक्रम ठेवला होता. त्यात सहभागी होण्यासाठी आरोपी रत्नदीप प्रकाश सोमकुंवर, प्रहार भारत लाडे आण हिमांशू साखरे आले होते. जन्मदिवसाची पार्टी, जेवण झाल्यानंतर ते सर्व आपसात चर्चा करू लागले. एवढ्यात अमन सहारेला एक फोन आला. त्याचवेळी सोमकुंवर आणि लाडे जोरजोरात बोलू लागले. त्यामुळे अमनने त्यांना शांत रहाण्यास सांगितले. त्यावरून आरोपी सोमकुंवर आणि लाडे अमन सोबत वाद घालू लागले. ते पाहून मुकुलचा भाऊ विवेक मध्यस्थी करायला गेला असता आरोपी सोमकुंवर, लाडे आणि सहारे यांनी चाकू आणि काठीने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. माहिती कळताच कपिलनगर ठाण्याचे पोलीस पोहचले. उपचारासाठी विवेकला मेयोत दाखल करण्यात आले तर, पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून सोमकुंवर आणि लाडेला अटक केली. सहारे फरार आहे.
---