शिकवणीची रक्कम नुकसानभरपाईसह द्यापावनभूमी, सोमलवाडा येथील अर्जुन वर्मा याने फ्यूचर विस्टा या कोचिंग क्लासकडे जेईई मेन आणि जेईई अडव्हान्स या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी शिकवणी लावली होती. यात त्याने १ जुलै २०१३ रोजी फ्यूचर विस्टामध्ये प्रवेश घेत संबंधित अभ्यासक्रमाचे प्रवेश शुल्क १ लाख ४० हजार रुपये जमा केले. अर्जुनला सदर शैक्षणिक सोय ही मॉर्डन स्कूल यांच्यासोबत देण्यात आली होती. यानुसार ११ वी करिता ६३ हजार व १२ वी करिता ९२ हजार अशी १ लाख ५५ हजार रुपये इतके शुल्क संबंधित कोचिंग क्लासला द्यावयाचे होेते. यानंतर फ्यूचर विस्टाच्या सल्ल्यानुसार अर्जुनने मॉर्डन स्कूलमध्ये प्रवेश घेतला. मात्र शिकवणी वर्गासाठी वेळ पुरत नसल्याने सदर अभ्यासक्रम सध्या थांबविण्यात यावा, अशी मागणी अर्जुनच्या आई रैना वर्मा यांनी फ्यूचर विस्टाकडे अर्ज करीत आपल्या पाल्याने सदर अभ्यासक्रमास उपस्थित राहण्यास अडचण येत असल्याने उर्वरित प्रवेश शुल्क परत करण्याची मागणी केली. यावर संबंधित कोचिंग क्लासने वर्मा यांना अर्ज करीत प्रवेश शुल्काच्या मूळ पावत्या अर्जासोबत जोडण्याचे सांगितले. यानंतर वर्मा यांनी फ्यूचर विस्टाच्या हैद्राबाद येथील मुख्यालयाकडेही प्रवेश शुल्क परत करण्याची मागणी केली. मात्र यावर कोचिंग क्लासकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्रस्त झालेल्या वर्मा यांनी ५ जुलै २०१४ रोजी फ्यूचर विस्टाला कायदेशीर नोटीस बजावली. तरीही त्यांचे पैसे परत मिळाले नसल्याने त्यांनी संबंधित तक्रारीचा आणि पुराव्यांचा आधार घेत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे दार ठोठावले. मंचाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम १२ नुसार अर्जुन यांच्याकडून १२ वीच्या शिकवणीचे आगाऊ घेतलेले प्रवेश शुल्क ६६ हजार ४९८ रुपये तक्रारीच्या तारखेपासून ( २२ डिसेंबर २०१४) प्रत्यक्ष अदायगीपर्यंत नऊ टक्के व्याजासह परत देण्याचे आदेश मंचाचे अध्यक्ष मनोहर चिलबुले आणि सदस्य मंजुश्री खनके यांनी फ्यूचर विस्टाला दिले.
कोचिंग क्लासने त्रस्त असलेल्या विद्यार्थ्याला दिलासा
By admin | Published: February 08, 2016 3:06 AM