नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा रद्द केल्यामुळे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या प्रेमीयुगुलाला दिलासा मिळाला. हे प्रकरण यवतमाळ जिल्ह्यातील आहे.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. संबंधित प्रेमीयुगुल अनेक महिने लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिले. दरम्यान, लग्नावरून वाद झाल्यामुळे तरुणीने तरुणाविरुद्ध १२ डिसेंबर २०२० रोजी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून तरुणाविरुद्ध बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर सत्र न्यायालयाने तरुणाला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. परिणामी, त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. ते अपील प्रलंबित असताना दाेघांनीही तडजोड करून वाद संपविला. तसेच, गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात संयुक्त अर्ज दाखल केला. दरम्यान, न्यायालयाने तरुणीला मराठीमध्ये आवश्यक विचारपूस केली. तिने तडजोड झाल्यामुळे आरोपीविरुद्ध कारवाई करण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. तसेच, गैरसमजूत व रागाच्या भरात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती दिली. त्यानंतर न्यायालयाला, यासह अन्य विविध मुद्दे लक्षात घेता हे प्रकरण कायम ठेवल्यास आरोपीला शिक्षा होऊ शकणार नाही व त्यामुळे न्यायिक प्रक्रियेचा दुरुपयोग होईल, असे आढळून आल्यामुळे संबंधित अर्ज मंजूर करण्यात आला. अर्जदारांतर्फे ॲड. अनिल ढवस व ॲड. राहुल हजारे यांनी कामकाज पाहिले.