उमरेड : तालुक्यातील नागरिकांसाठी खूशखबर आहे. कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत कमालीची घट दिसून येत असल्याने प्रशासन तथा नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे. उमरेड तालुक्यात ९० टक्के रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी मागील काही महिन्यापासूनची नीचांक आकडेवारी प्राप्त आली. तालुक्यात एकूण ९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील केवळ २ तर ग्रामीण भागातील ७ रुग्ण आहेत.
कधी नव्वद तर कधी शंभरीची आकडेवारी पार करीत मागील काही दिवसात तालुक्यात कोरोनाचा कहर दिसून येत होता. शिवाय मृत्यूसंख्येतही वाढ झाली होती. अशातच आता मागील काही दिवसांपासून बाधितांच्या आकडेवारीत घट होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. काही दिवसापासूनच्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीकडे नजर टाकल्यास १० मे रोजी ६५ कोरोनाबाधीत रुग्ण तसेच ११ मे (२३), १२ (८१), १३ (३९), १४ (५८), १५ (५२), १६ मे रोजी केवळ १४, १७ आणि १८ मे रोजी प्रत्येकी ३५ आणि आज बुधवारी केवळ ९ रुग्णांची नोंद झाली.
तालुक्यात आतापर्यंत ६,८७९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यापैकी शहरातील ३,५५८ (५१.७२ टक्के) तर ग्रामीण भागात ३,३२१ (४८.२८) रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे १३१ (१.९० टक्के) जणांना प्राण गमवावे लागले. यामध्ये शहरातील तब्बल ८२ तसेच ग्रामीण भागातील ४९ जण आहेत. एकूण ६८७९ रुग्णांपैकी ६,२४५ (९०.७८ टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये ३,३२१ (४८.२८ टक्के) शहरातील तर २,९२४ (४२. ५१) ग्रामीण भागातील आहेत. तसेच तालुक्यात ५०३ (७.३१ टक्के) रुग्णांवर औषधोपचार सुरू आहे. यात शहरातील १५५ आणि ग्रामीण भागातील ३४८ रुग्ण आहेत.
---
गाफिल राहू नको
मागील काही दिवसांपासून बाधितांची संख्या जरी रोडावली असेल तरी शासन-प्रशासन-लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी गाफिल राहून नये. गर्दी करू नये. सभा, बैठका, कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करताना योग्य नियमावलीचे पालन करावे. जेणेकरून लोकांमध्ये सुद्धा चांगला संदेश जाईल.
-
मधल्या कालखंडात लग्नसोहळे, सार्वजनिक कार्यक्रम, सभा, बैठका यावर बंधने लादल्यानंतरही अनेकांनी दुर्लक्ष केले. यामुळेच संक्रमण वाढले. आता दिलासादायक स्थिती असली तरी सावधगिरी बाळगणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे अन्यथा पुन्हा बेजबाबदारपणाच कारणीभूत ठरेल.
डॉ. जितेश चव्हाण, उमरेड
---