लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यावर्षी अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे राज्यभर विविध पिकांचे मोठे नुकसान झाले. १७ लाख हेक्टरहून अधिक पिकांना फटका बसला. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सद्य:स्थितीत एनडीआरएफच्या निकषानुसार हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत केली जाते. या मदतीत वाढ होण्यासाठी निकषात बदल होणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे. सप्टेंबरच्या शेवटी यात बदल होतील व शेतकऱ्यांना वाढीव मदत तत्काळ देता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. (Crop compensation criteria will change)
मेट्रोेने बॅकलॉग भरला नाही तर मुख्यमंत्र्यांशी बोलून गुन्हे दाखल करणार
- नागपुरात महामेट्रोच्या नोकर भरतीत मागासवर्गीयांचे आरक्षण डावलण्यात आले आहे. आकडेवारीवरून ते स्पष्टही झाले आहे. मेट्रोच्या व्यवस्थापनाने त्वरित ही चूक दुरुस्त करून मागासवर्गीय उमेदवारांना सामावून घ्यावे, अन्यथा या प्रकाराची चौकशी केली जाईल व मेट्रो प्रशासनावर गुन्हे दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाईल, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला. मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्याशी आपण स्वत: चर्चा करू. चूक लक्षात आणून देऊ. सुधारण्याची संधी देऊ. यानंतर विधिमंडळाच्या मागासवर्गीय समितीकडे तक्रार करू. आंदोलनातून मार्ग न निघाल्यास मेट्रोला रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
पवारांच्या वक्तव्यावर पटोलेंचे समर्थन
- काँग्रेसला लक्ष्य करणारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना उत्तर देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची वडेट्टीवार यांनी पाठराखण केली. पटोले यांचे वक्तव्य योग्य आहे, असे सांगत यावर अधिक बोलणे त्यांनी टाळले.