लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिवसेनेचे पक्षप्रमुख ११ मे रोजी विदर्भ पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. या बैठकीदरम्यान शिवसेनेच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून स्वबळावर निवडणुका लढण्यासंदर्भात त्यांच्या भावनादेखील जाणून घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष संघटन मजबुतीसाठी ही बैठक महत्त्वाची मानण्यात येत आहे .आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. विदर्भातील अनेक ‘पॉकेट्स’मध्ये शिवसेनेचा प्रभाव आहे. अशा स्थितीत पक्षाच्या कार्याचा आढावा घेण्यासोबतच तेथील पक्ष संघटना मजबुतीसंदर्भात उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. ११ मे रोजी उद्धव ठाकरे यांचे नागपुरात आगमन होईल व रविभवन येथे बैठक होणार आहे. या बैठकीला विदर्भातील सेनेचे मंत्री, खासदार, आमदार यांच्यासमवेत सर्व जिल्हाप्रमुखदेखील उपस्थित राहणार आहेत.भाजपा-सेनेमध्ये पुढील निवडणुकांसाठी युती होणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात विविध कयास लावण्यात येत आहेत. विधान परिषदेच्या सहा जागांपैकी तीन जागांवर शिवसेनेने उमेदवार दिले आहेत. उर्वरित ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु हा ‘फॉर्म्युला’ केवळ याच निवडणुकांपुरता राहणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली तरी शिवसेना स्वबळावरच निवडणूक लढविणार असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले आहे. विदर्भात भाजपाची संघटनशक्ती लक्षात घेता शिवसेनेनेदेखील विशेष लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले आहे. विदर्भात सद्यस्थितीत शिवसेनेचे चार खासदार व चार आमदार आहेत. या पार्श्वभूमीवर संघटनशक्ती मजबूत करण्याचे मोठे आव्हान शिवसेनेसमोर आहे. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व आले आहे. आम्हाला मुंबई पक्ष कार्यालयातून पक्षप्रमुखांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आला आहे. सर्व पदाधिकाऱ्यांना आवश्यक तो निरोप पोहोचविण्यात आला असून उद्धव ठाकरे पक्ष संघटन बळकटीसाठी संवाद साधतील, असे जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांनी सांगितले.उमेदवार शोधण्याचे आव्हानविदर्भात शिवसेनेला अद्यापही हवे तसे पाय रोवता आलेले नाहीत. विदर्भात विधानसभेचे ६२ मतदारसंघ आहेत. २०१४ च्या निवडणुकांमध्ये भाजपचे ४४ उमेदवार विजयी झाले होते, तर शिवसेनेला ४ जागांवर समाधान मानावे लागले होते. २००९ मध्ये युती असताना सेनेचे ८ उमेदवार विजयी झाले होते. अनेक मतदारसंघात योग्य नेतृत्वदेखील सेनेला मिळालेले नाही. काही निवडक भाग सोडले तर बऱ्याच ठिकाणी तर सक्षम उमेदवारदेखील मिळण्यास अडचण जाणार आहे. अशा स्थितीत पक्षासमोरील हे मोठे आव्हानच राहणार आहे.