नागपूर : दंडकारण्य अर्थात गडचिरोलीत माओवादी हिंसक कारवायांना नामोहरम करणाऱ्या गडचिरोली पोलिस दलातील सी-६० कमांडोंनी डिसेंबर ते जानेवारी असा १५ हजार किमीचा प्रवास दुचाकीने पूर्ण केला आणि ते आपल्या कर्तव्यावर पुन्हा परतले आहेत. सोमवारी सकाळी त्यांनी नागपुरात महाल येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेतले. यावेळी श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने त्यांचे जल्लोषात स्वागत व सत्कार करण्यात आला.
गडचिरोतील स्थिती आणि माओवाद्यांसोबत उडणारा संघर्ष, पोलिस आणि सी-६० कमांडोंचे कार्य, वनवासींमध्ये संचारलेला भय दूर करण्याची पद्धत यासोबतच गडचिरोतील निसर्गसौंदर्य व लोकसंस्कृतीची माहिती उर्वरित देशाला व्हावी, यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सी-६०तील किशोर खोब्रागडे, अजिंक्य तुरे, राहुल जाधव, रोहित गोगले, देवा अडोले व प्रशांत कावळे या सहा कमांडोंनी ही मोहीम आखली होती. त्याअनुषंगाने मोहिमेतील प्रारंभीच्या टप्प्यात उत्तर भारतातील ११ राज्यांतून ९ हजार किमी तर दुसऱ्या टप्प्यात पश्चिम भारतातील ६ हजार किमीचा प्रवास बाईकद्वारे पूर्ण केला. त्यांचा हा प्रवास सोमवारी नागपुरात पूर्ण झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनाच्या पर्वावर या सहा कमांडोंचा सत्कार श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने करण्यात आला. याप्रसंगी चंदू पेंडके, श्रीकांत देहाडराय, विवेक पोहाणे, अभिषेक सावरकर, जय आस्कर, साहिल काथोटे, भूषण वानखेडे, कुशांक गायकवाड, विवेक सूर्यवंशी, देवेंद्र लक्षणे, पंकज धुर्वे, प्रवीण घरजाळे, प्रशांत झाडे, ऋतिक वाकोडीकर, संकेत चुटके, यश, विशाल देवकर, दत्ता शिर्के उपस्थित होते.
...............