लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘‘या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥’’ अशी प्रार्थना करत शनिवारपासून नागपूरसह देशभरात घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवास शांततेत प्रारंभ झाला.
कोरोना पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव अनेकार्थाने महत्त्वाचे ठरतो. ‘बायोलॉजिकल वेपन’ म्हणा किंवा जागतिक महामारी, सर्व यंत्रणा या संकटापासून जगताला मुक्ती मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्राचीन भारतात देवीच्या प्रत्येक स्वरूपाला संकट निर्दालनात अग्रेसर देवता मानले गेले आहे. वर्तमानातील संकटापासून मुक्त करण्याची आराधना भाविक करत आहेत. अनेक निर्बंध आहेत आणि ते निर्बंध पाळत नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. पुढचे नऊ दिवस देवीच्या प्रत्येक स्वरूपाची आराधना या काळात केली जाणार आहे. शहरातील अनेक प्रमुख देवस्थानात सकाळीच विधिविधान पाळत घटस्थापना करण्यात आली. बहुतांश देवस्थानात व मंडळांमध्ये सामूहिक अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करण्याचे टाळले गेले. गर्दी होऊ नये आणि अकारण संसर्गाला सामान्य जन बळी पडू नये, हाच हेतू त्यामागचा आहे. त्याला पर्याय म्हणून देवस्थानांनी आणि धर्मपंडितांनी भाविकांना देवीच्या प्रत्येक स्वरूपाची आत्मिक आराधना करण्याचे आवाहन केले आहे. त्याच अनुषंगाने काही अपवाद वगळता सर्वच देवस्थानांत आणि सर्व मंडळांनी एकच अखंड ज्योत प्रज्वलित करून भक्तांना आत्मिक संकल्प सोडण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या सात महिन्यापासून कुलूपबंद असलेली आणि आताही बंद ठेवण्याचे शासन आदेश असतानाही केवळ भावनेला मनोविज्ञानाचा आधार म्हणून देवस्थाने आज भक्तांसाठी उघडण्यात आली आहेत. देवस्थान प्रशासनाकडून भक्तांना आत येण्यास मज्जाव करण्यात आला असला तरी दुरूनच विशिष्ट अंतराद्वारे दर्शन करण्याची मुभा भक्तांना दिली आहे.
माँ भवानी देवस्थान पुनापूर, श्री महालक्ष्मी देवस्थान महाल, श्री आग्याराम देवी देवस्थान शुक्रवारी तलाव, श्री रेणुका माता देवस्थान सेंट्रल एव्हेन्यू रोड, मानस चौक अशा विविध ठिकाणातील प्रमुख देवस्थानांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणेने शुक्रवारपासूनच परिसराला बॅरिकेड्सने घेराव टाकला आहे. भक्त संपूर्ण मर्यादेचे भान ठेवत देवस्थानांमध्ये दर्शन घेण्यास आतुर आहेत आणि त्यांना टप्प्याटप्प्यात सोडलेही जात आहे. एकूणच संपूर्ण शहरात मर्यादेनेच का होईना, नवरात्रोत्सवाची गजबज दिसून येत आहे आणि वातावण भावभक्तिमय झाल्याचे दिसून येत आहे.