लाेकमत न्यूज नेटवर्क
सावरगाव : दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. शिवाय नाला-ओढ्यांमध्ये माेठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. यामुळे पाऊस पडला तरीदेखील पावसाचे पाणी वाहून जात असल्याने भूजल पातळी खाेल गेली आहे. ही बाब लक्षात घेता खाेल गेलेली भूजल पातळी टिकून राहावी व परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा, याकरिता खेडी मन्नाथ ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने नाला खाेलीकरण व सरळीकरणाच्या कामाला नुकताच प्रारंभ करण्यात आला.
महात्मा गांधी याेजनेंतर्गत सरपंच अनिल बांदरे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. खेडी मन्नाथ शिवारातील माराेतराव धुर्वे यांच्या शेतापासून प्रेमलाल मसराम यांच्या शेतापर्यंत ३०० मीटर नाल्याचे खाेदकाम करून खाेलीकरण व सरळीकरण करण्यात येणार आहे. यावेळी ग्रा.पं. सदस्य प्रदीप ढाेके, रवींद्र सहारे, बाबाराव बागडे, बाबूराव नेहारे, सदाशिव शेंद्रे, शिवाजी धांडे, ग्रामसेवक जी. एस. शेळके, वनविभागाचे पांडे, तांत्रिक अधिकारी जयश्री कळंबे, राेजगार सेवक विलास बागडे आदी उपस्थित हाेते.
खंडविकास अधिकारी प्रशांत माेहाेड, नरेगाचे सहायक कार्यक्रम अधिकारी अविनाश सावरकर व तांत्रिक अधिकारी जयश्री कळंबे यांच्या मार्गदर्शनात हे काम हाेत असून, राेजगार हमी याेजनेतील मजुरांकरवी हे काम पूर्ण हाेणार आहे. नरेगाअंतर्गत राेजगार मिळाल्याने गावातील कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार आहे. शिवाय या कामामुळे भूजल पातळीत वाढ हाेणार असून, परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. यावेळी ८७ महिला व पुरुष मजूर कामावर उपस्थित हाेते.