नागपूर : सैन्यदलातील अग्नीवीर भरती प्रक्रियेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. विदर्भातील दहा जिल्ह्यांतील (बुलडाणा वगळून) तरुणांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या १५ मार्चपर्यंत नोंदणी करता येईल. यावेळी अग्नीवीर भरती प्रक्रियेत थोडा बदल करण्यात आला आहे. आता लेखी परीक्षा अगोदर होईल व त्यात यशस्वी ठरलेल्या तरुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व सैन्यदल भरती अधिकारी कर्नल जगथ नारायण यांनी गुरुवारी यासंदर्भात पत्रपरिषदेत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गेल्या १६ फेब्रुवारीपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत केवळ ५ हजार तरुणांनीच ऑनलाईन नोंदणी केली आहे. १५ मार्चपर्यंत नोंदणी करता येईल. त्यामुळे तरुणांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी. www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल. १७ एप्रिल ते ४ मे दरम्यान लेखी परीक्षा होईल. २० मे रोजी परीक्षेचा निकाल लागेल. त्यानंतर ५ जुलै ते ११ जुलै दरम्यान अग्नीवीर भरती मेळावा (शारीरिक चाचणी ) होईल. यात यशस्वी झालेल्या तरुणांची अग्नीवीरच्या प्रशिक्षणासाठी निवड केली जाईल.
- ६० हजारपैकी केवळ हजार तरुण घेताहेत अग्नीवीरचे प्रशिक्षणमागच्या वेळी विदर्भातील जवळपास ६० हजार तरुण अग्नीवीर भरती मेळाव्यात सहभागी झाले होते. यापैकी हजार तरुणांची अग्नीवीर प्रशिक्षणासाठी निवड झाली. काही तरुणांची निवड होऊनही ते अग्नीवीरसाठी आले नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
- भरती प्रक्रिया पारदर्शी, आमीषाला बळी पडू नकाअग्नीवीर भरती प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शी आहे. त्यामुळे कुणी यात उत्तीर्ण करून देण्याचे आमीष दाखवत असेल तर अशा आमीषापासून दूर राहा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.