लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : डिसेंबर-२०२१ ते फेब्रुवारी-२०२२ या काळात कामठी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक हाेणार असल्याने, त्या अनुषंगाने निवडणुकीच्या पूर्वतयारीला प्रशासनाने सुरुवात केली आहे. ही निवडणूक ‘एक वाॅर्ड-एक नगरसेवक’ या जुन्याच पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने, शहरात वाॅर्ड रचनेला सुरुवात करण्यात आली आहे.
यासंदर्भात राज्य निवडणूक आयाेगाने नुकतेच आदेश जारी केल्याने, शहरात वाॅर्डांच्या नव्याने रचना करण्याच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. पूर्वी नगरपालिकांची निवडणूक एक वाॅर्ड-एक नगरसेवक या पद्धतीने व्हायची. मध्यंतरी यात बदल करण्यात आला आणि पालिकेची निवडणूक प्रभाग पद्धतीने घेतली जायची. एका प्रभागात किमान दाेन तर कमाल तीन किंवा चार नगरसेवक निवडून दिले जायचे. आगामी निवडणूक ही जुन्याच पद्धतीने घेतली जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयाेगाने कळविले आहे.
प्रभागाचा आराखडा तयार करण्यासाठी नगर परिषदेच्या संपूर्ण क्षेत्राची माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, संगणक तज्ज्ञ तसेच आवश्यकतेनुसार अधिकारी नेमून मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली जाणार आहे. या प्रारूप प्रभाग रचनेबद्दल असलेल्या तक्रारींचे निवारण वेळीच करून, प्रारूप प्रभाग रचना प्रक्रियेत गोपनीयता ठेवण्यात येणार आहे.
...
सन २०११ ची जनगणना विचारात
वाॅर्डांचे प्रारूप निश्चित करण्यासाठी सन २०११ ची जनगणना विचारात घेतली जाणार आहे. कामठी नगर परिषद क्षेत्राची लाेकसंख्या ८६ हजार ७९५ असून, यात अनुसूचित जातीची लाेकसंख्या २४ हजार ३५२ तर अनुसूचित जमातीची लाेकसंख्या १,९६१ एवढी आहे. सन २०११ च्या सर्वेक्षणानुसार कामठी शहरात निवडणुकीसाठी एकूण ३१ वाॅर्डची निर्मिती करण्यात आली हाेती. प्रभाग पद्धती लागू करण्यात आल्याने चार वाॅर्डांचा एक प्रभाग याप्रमाणे आठ प्रभाग तयार करण्यात आला. यातील सात प्रभाग चार तर आठवा प्रभाग तीन वाॅर्डांचा तयार करण्यात आला हाेता.
...
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रारूप वाॅर्ड रचना करण्याच्या कामाला २४ ऑगस्टपासून सुरुवात हाेणार आहे. यात निवडणूक आयोगाचे निकष, नियमातील तरतुदी व न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन त्याचे काटेकोर पालन केले जाईल. प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करून मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांना पाठविला जाईल. विभागीय आयुक्त या आराखड्याला अंतिम मंजुरी देतील.
- संदीप बाेरकर, मुख्याधिकारी,
नगर परिषद, कामठी.