नागपूर : काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारी कारवाया व अवैध धंदे वाढले असून, ठाणेदारांनी त्याचा तातडीने बंदोबस्त करावा. जे अपयशी ठरतील त्यांना आपली खुर्ची गमवावी लागू शकते, असा इशाराच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. क्राईम बैठकीत अकार्यक्षम ठाणेदारांना त्यांनी चांगलेच खडसावले. यामुळे आता पोलीस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
शहरात अवघ्या पाच दिवसांत खुनाच्या तीन घटना घडल्या. गुन्हेगारांवर नजर ठेवण्यात पोलिसांना अपयश आल्याने या घटना घडल्या आहेत. या घटनांची गांभीर्याने दखल घेत पोलीस आयुक्तांनी तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. गुरुवारी झालेल्या क्राईम बैठकीत या बदल्यांचा संदर्भ देत पोलीस आयुक्तांनी काही पोलीस ठाण्यांचा खरपूस समाचार घेतला. पोलीस अधिकारी गुन्हेगार आणि अवैध धंद्यावर कारवाई करू शकत नाहीत. त्यांना कुख्यात गुन्हेगारांच्या कारवायाही कळत नाहीत. डीबी टीमच्या आधारे ते पोलीस ठाणे चालवतात. मकोकासारख्या गंभीर प्रकरणातील वॉन्टेड गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागत नाही. हे या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचेदेखील अपयश आहे, असे अमितेश कुमार यांनी प्रतिपादन केले.
गुन्हेगारांची नावे घेत अमितेश कुमार यांनी त्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी काय केले जात आहे, असा सवाल केला. खून, खुनाचा प्रयत्न, मकोका यांसारख्या गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांविरोधात कडक मोहीम राबवण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले. गुन्हेगाराला कोणतीही दयामाया दाखवू नये, असे ते म्हणाले. जुगार, सट्टा, दारू, ड्रग्ज इत्यादी बेकायदेशीर धंद्यांना कोणत्याही किमतीत चालू देऊ नये, असे त्यांनी कडक शब्दांत सांगितले.
पोलिसांच्या 'गुन्हेगारी बुद्धिमत्ते'वरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांना कामात सुधारणा करण्याचा सल्लाही दिला. महिलांच्या गुन्ह्यातील गुन्हेगार आणि अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांचीही गांभीर्याने दखल घेण्याचे निर्देश दिले. शहरातून दर महिन्याला मोठ्या प्रमाणात अल्पवयीन विद्यार्थिनींचे अपहरण होत आहे. प्रेम प्रकरणाच्या बहाण्याने बहुतांश अल्पवयीन मुले फरार होतात. स्थानिक पोलीस अपहरणाचा गुन्हा नोंदविण्याशिवाय दुसरे पाऊल उचलत नाहीत, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.