लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणे दिसत नसली तरी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार मी स्वत:ला होम आयसोलेट करून घेतले आहे. गेल्या १४ दिवसात माझ्याशी संपर्क आलेल्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मुंढे यांनी केले आहे.आपण आयसोलेशनमध्ये असून नागपूर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी घरातूनच काम करणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले आहे. ही लढाई आपण जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.नागपूर शहरात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना वेळोवेळी काळजी घेण्याचे व नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.अटेंडंट पॉझिटिव्ह आल्याने केली चाचणीदोन दिवसांपूर्वी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बंगल्यातील अटेंडंट पॉझिटिव्ह आला, यामुळे सोमवारी मुंढे कुटुंबीयांची चाचणी केली असता तुकाराम मुंढे आणि एक सुरक्षारक्षक पॉझिटिव्ह आलेत. घरातील इतर सदस्य निगेटिव्ह आहेत.खासगी रुग्णालयांवर वॉच ठेवण्यासाठी पथक
कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत, कोरोना बाधितांची लुटमार होऊ नये, यासाठी तुकाराम मुंढे यांनी विशेष पथक स्थापन केले आहे.नागपूर शहरातील खासगी रुग्णालयांवर वॉच ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी रुग्णालयांना घालून दिलेल्या नियमांचे अंमलबजावणी होते की नाही, यावर विशेष पथक लक्ष ठेवणार आहे. रुग्णालयांची अचानक पाहणी करून काही आक्षेपार्ह आढळल्यास तात्काळ कारवाईचा बडगाही उगारण्यात येणार आहे.
मुंढे यांना ‘लो व्हायरस लोड’मेयोने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, मनपा आयुक्त मुंढे यांच्या ‘आरटी-पीसीआर’ चाचणीत ‘लो व्हायरस लोड’ असल्याचे निदान झाले. त्यांनी तातडीने तपासणी केल्याने आजार पसरण्याचा धोका कमी झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांना कुठलीही लक्षणे नाहीत. यामुळे होम आयसोलेशनचा निर्णय त्यांनी घेतला आहे.सेवाकार्य थांबणार नाहीमागील साडेपाच महिने कोरोना या विषाणूशी आपण सगळे लढा देत आहोत. कोरोनाच्या नागपुरातील एन्ट्री नंतर अत्यावश्यक सेवा म्हणून कार्य करताना माझ्यासोबत माझ्या प्रत्येक सहकाऱ्याने आवश्यक ती सर्व काळजी घेतली. मात्र, सेवा देताना कुठे ना कुठे कोरोना रुग्णांशी संपर्क येत गेला. यातून मनपाच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. आज मी स्वत: पॉझिटिव्ह निघालो. काळजी म्हणून मी गृह विलगीकरणात राहीन. परंतु, आपल्या सेवेचे कार्य थांबणार नाही. मी जेथे असेल तेथून नागपुरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणे सुरू राहील. कारण मी जरी पॉझिटिव्ह आलो तरी आपण पॉझिटिव्ह येऊ नये, यासाठी माझी धडपड सुरूच राहील. जे पॉझिटिव्ह आलेत त्यांना योग्य उपचार मिळावे, यासाठी व्यवस्था सुदृढ ठेवण्याचा माझा संकल्प या काळातही पूर्णत्वास नेईल, अशी ग्वाही तुकाराम मुंढे यांनी दिली.