लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लकडगंज झोन कार्यालयाच्या मागे महापालिकेचा आठ एकराचा भूखंड आहे. या जागेवर शहर बसचा डेपो प्रस्तावित असल्याने येथील लेंडी तलाव परिसरातील अतिक्रमण तातडीने हटविण्याचे निर्देश अतिक्रमण, तसेच महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी दिले. शुक्रवारी आयुक्तांनी या भागाची पाहणी केली.यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते. महापालिकेच्या मोक्याच्या जागेवरील भूखंडावर झालेल्या अतिक्रमणाबाबत आयुक्तांनी चिंता व्यक्त केली. येथील अतिक्रमण हटवून सुरक्षा भिंत उभारण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.तसेच आयुक्तांनी लेंडी तलावाची पाहणी केली. तलावाचे पाणी निघून जाण्यासाठी असलेल्या आऊटलेटवर मोठे अतिक्रमण आहे. त्यामुळे पाणी निघून जाण्याचा मार्ग बंद झाल्याची माहिती उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी दिली. अतिक्रमण हटविले जात नाही, तोपर्यंत तलाव स्वच्छ होणार नाही नसल्याचे पार्डीकर यांनी निदर्शनास आणले. येथील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश आयुक्तांनी सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वºहाडे यांना दिले. तसेच तलावाचा सुधारित प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली. मागील वषीर्ही तलावाच्या स्वच्छतेसाठी १५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला. परंतु अतिक्रमणामुळे याचा उपयोग झाला नाही.त्यानंतर आयुक्तांनी जुन्या भंडारा मार्गावरील इतवारी रेल्वेस्थानक पुलानजिकच्या मटन मार्के ट असलेल्या हरिगंगा इमारतीची पाहणी केली. सहायक आयुक्त (बाजार) विजय हुमणे यांनी आयुक्तांना इमारतीबाबतची माहिती दिली. या इमारतीसंदर्भातही आयुक्तांनी आवश्यक ते निर्देश संबंधितांना दिला. यानंतर पिवळी नदीच्या ज्या भागात स्वच्छता अभियान सुरू आहे, त्या गौतम नगर, समता नगर परिसराला भेट दिली. स्वच्छता अभियानादरम्यान काढण्यात येणारा गाळ भिंतीला रेटून लावा. त्यानंतर तो गाळ टिप्परने इतरत्र हलवा जेणेकरून पाण्यासोबत तो वाहून जाणार नाही. याची खबरदारी घेण्याची सूचना केली. पिवळ्या नदीच्या तीराची मालकी पूर्णपणे महापालिकेची आहे. या तीरावरची घाण स्वच्छ करून येथे वृक्षारोपण करा, जेणेकरून भविष्यात अतिक्रमण होणार नाही, असे निर्देश आयुक्तांनी दिले.