नागपूर : रुग्णालयात भरती होऊन दीड तास होत नाही, तोच ती स्वत:चा गाऊन फाडते, त्याला गळ्याभोवती आवळून आत्महत्या करते. बुधवारी घडलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील या घटनेकडे संशयाने पाहिले जात आहे. रुग्णालयाने चौकशी समिती स्थापन केली असून, शनिवारी आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ.स्वप्निल लाडे हे रुग्णालयाला भेट देणार आहेत.
प्रतिभा महादेव कोल्हे (वय ३८) त्या मृत महिलेचे नाव. हिंगणघाट तालुक्यातील आजंता हे प्रतिभाचे मूळ गाव. प्राप्त माहितीनुसार, मंगळवार, १५ नोव्हेंबर रोजी प्रतिभाचे नातेवाईक तिला मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करतात. १६ नाव्हेंबरला मेडिकल डॉक्टरांच्या सूचनेवरून दुपारी ३ वाजताच्या सुमारास प्रादेशिक मनोरुग्णालयात तिला भरती करतात. रुग्ण निरीक्षण कक्षात तिच्यावर उपचार सुरू असतानाच, अचानक एक रुग्ण गंभीर झाल्याने तेथील कार्यरत डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी तिला बाजूच्या एका खोलीत ठेवून निघून जातात. याच दरम्यान, ती स्वत:चा गाऊन फाडून त्याला गळ्याभोवती स्वत:च्या दोन्ही हातांनी आवळून आत्महत्या करते. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ही घटना समोर येताच खळबळ उडते. याची माहिती मानकापूर पोलिस ठाण्याला दिली जाते. त्यांच्याकडून या घटनेची चौकशी सुरू असली, तरी संशय व्यक्त केला जात आहे.
-शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल प्राप्त
प्रादेशिक मनोरुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.रवी कोरडे म्हणाले, मेयोमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. यात तिचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे. या घटनेच्या गंभीरतेला घेऊन रुग्णालयाच्या वतीने चार सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. लवकर याचा अहवाल येईल. सामान्य व्यक्तीला स्वत:ला गळफास लावून तो स्वत:च्या हाताने आवळणे शक्य नाही, परंतु मनोरुग्ण हिंसक झाला असेल, तर ते शक्य आहे.
-आरोग्य विभागाकडूनही चौकशी
या घटनेला आरोग्य विभागानेही गंभीरतेने घेतले. आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ.स्वप्निल लाडे हे शनिवारी रुग्णालयाला भेट देऊन घटनेची चौकशी करणार आहे. एकूणच हे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात असून, चौकशी समिती काय अहवाल देते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.