लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसना मागण्यासंदर्भात आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलकांशी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी चर्चा करुन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती गठित केली असून १५ दिवसात निर्णय घेण्यात येईल. या यशस्वी चर्चेनंतर प्रकल्पग्रस्तांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.हैदराबाद हाऊस नागपूर येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी सकाळी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त समितीचे पदाधिकारी तसेच आमदार बच्चू कडू व विभागीय आयुक्त अश्विन मुद्गल, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे तसेच महसूल व जलसंपदा विभागांच्या अधिकाºयांसोबत बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. गोसेखुर्द प्रकल्पातील बाधित गावांपैकी काही गावांचे पुनर्वसन झाले आहे व काही गावांचे अद्याप बाकी आहे. अशा गावांना आवश्यक सुविधा देण्याबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. ज्या गावात नागरी सुविधा बंद आहेत. अशा गावात नागरी सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच विजेचे प्रश्न सोडविणे यासंदर्भातही यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
आ. बच्चू कडूंसह एक हजार आंदोलकांवर गुन्हे दरम्यान, या आंदोलनाचे नेतृत्व करणारे आमदार बच्चू कडू तसेच भंडारा येथील बाळकृष्ण जुवार, यशवंत टिचकुले, अरुण हटवार, राजेंद्र वाघ, मंगेश वंजारी, रमेश कारेमोरे, भाऊ कातोरे, रूपेश कातोरे, रूपेश आतिलकर आणि सुमारे एक हजार आंदोलकांवर शनिवारी सीताबर्डी पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. आ. कडू आणि आंदोलकांवर बेकायदा जमाव जमवून आमदार निवासातील अन्य रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणे, पोलिसांवर दगडफेक करणे, पाण्याच्या टँक खाली फेकणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा आरोप लावला आहे. त्यानुसार, या सर्वांविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात कलम १४३, १४७, १४९, ३३६, ४२७ भादंवि तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे सहकलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.