लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वेच्या रुळावर लोकल मेट्रो चालविण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या आदेशावरून चार सदस्यांची संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. समितीत मेट्रो आणि रेल्वे अधिकाऱ्यांचा समावेश असून विविध बाबींची चाचपणी केल्यानंतर ही समिती रेल्वेच्या रुळावर लोकल मेट्रो चालविण्याबाबत आपला अहवाल सादर करणार आहे.रेल्वे बोर्डाने नियुक्त केलेल्या संयुक्त समितीत मध्य रेल्वे मुख्यालयाचे प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक, मध्य रेल्वे नागपूर विभागाचे डीआरएम सोमेश कुमार श्रीवास्तव आणि मेट्रोचे रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथूर यांचा समावेश आहे. ही समिती मेट्रोची लोकल कुठून येणार, ती चालवणार कोण, कुठून कुठपर्यंत धावणार, किती स्टेशनला थांबा राहील, संबंधित मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद कसा राहील, मेन्टेनन्स कुठे होईल, उत्पन्नातील वाट्याची विभागणी कशी होईल तसेच तिकीट दर किती राहतील याबाबतचा अहवाल सादर करणार आहे. रेल्वे रुळावर लोकल मेट्रो चालविण्याचा विचार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडला होता. मेट्रोच्या दुसºया टप्प्यातील प्रकल्प अहवाल सादर करण्यापूर्वी गडकरींनी याबाबत आढावा बैठक घेतली होती. बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दिक्षित रामटेक, कामठी, वर्धा, भंडारा पर्यंत रेल्वेमार्गावर मेट्रो लोकल चालविण्याबाबत सादरीकरण केले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी हा प्रकल्प पुढे नेण्याच्या सूचना दिल्या होत्या. याबाबत महामेट्रोने दिल्लीत रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावून रेल्वे बोर्डाच्या आदेशावरून ही समिती नियुक्त केली आहे. सध्या रेल्वेकडे मुंबई मार्गावर अप आणि डाऊन अशा दोनच लाईन आहेत. याच लाईनवरून प्रवासी, माल वाहतूक करण्यात येते. हे मार्ग अतिशय व्यस्त असून थर्ड लाईन झाल्याशिवाय लोकल मेट्रो चालविणे शक्य होणार नाही. तसेच इटारसी-नागपूर आणि सेवाग्राम-बल्लारशा दरम्यानही थर्ड लाईन झाल्यावरच हा प्रकल्प अस्तित्वात येऊ शकणार आहे.
नागपुरात रेल्वे मार्गावर लोकल मेट्रो चालविण्यासाठी समिती गठित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 11:06 PM
रेल्वेच्या रुळावर लोकल मेट्रो चालविण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या आदेशावरून चार सदस्यांची संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. समितीत मेट्रो आणि रेल्वे अधिकाऱ्यांचा समावेश असून विविध बाबींची चाचपणी केल्यानंतर ही समिती रेल्वेच्या रुळावर लोकल मेट्रो चालविण्याबाबत आपला अहवाल सादर करणार आहे.
ठळक मुद्देरेल्वे बोर्डाला अहवाल देणार : विविध बाबींची होणार चाचपणी