नागपूर : शिक्षण सभापतींनी दप्तर खरेदीची प्रक्रिया नियमबाह्य केल्याचा आरोप काँग्रेसच्या सदस्यांनीच केला आहे. त्यामुळे अध्यक्षांनी दप्तर खरेदीच्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग पॉलिमर दप्तर खरेदी करणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २.७५ कोटी रुपये निधी मिळाला आहे. खरेदीसाठी आवश्यक निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून साहित्याचा पुरवठाही झाल्याची माहिती आहे. आता सदस्यांनी या विषयावर आक्षेप घेतला आहे. हा विषय शिक्षण समितीच्या बैठकीत आला नाही. नियमानुसार समितीमध्ये येणे आवश्यक असल्याचे सांगत सर्वसाधारण सभेत प्रकाश खापरे, मिलिंद सुटे यांच्यासह काही सदस्यांनी खरेदीला स्थगिती देण्याची मागणी केली. सदस्यांनी एकप्रकारे शिक्षण सभापती भारती पाटील यांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेतला. शिक्षण सभापती समिती सदस्यांशी समन्वय न साधता एकतर्फी निर्णय घेत असल्याची सदस्यांची ओरड आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रकरणात सभापतींच्या कार्यप्रणालीवर अध्यक्षांनी आक्षेप घेतला होता.
- नियमानुसार दप्तराच्या खरेदीचा विषय शिक्षण समिती समोर ठेवणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे आम्ही आक्षेप घेतला. अध्यक्ष बर्वे यांनी शिक्षण समितीच्या मंजुरीनंतर हा विषय सर्वसाधारण सभेत ठेवण्याचे निर्देश देत याला स्थगिती दिली आहे.
प्रकाश खापरे, सदस्य, जि.प.