नागपूर : समाजात महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या घटना लक्षात घेता महिला असुरक्षित असल्याची भावना आहे. त्या हतबल असून, त्यांनाच सुरक्षा पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा वातावरणात नागपुरातील ममता राजेश गिरीपुंजे या महिलेने समाजाला सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी एक आव्हान म्हणून स्वीकारली आहे. यात येणाऱ्या आव्हानांचा सामना करीत त्या यशस्वीपणे सुरक्षिततेचे कवच प्रदान करीत आहेत.आयुष्यातील काही प्रसंग असे घडतात, त्यातून मार्ग काढणे फार कठीण होऊन जाते. अशा प्रसंगात तर काही महिला हतबल होऊन, आयुष्य संपविण्याचे धाडस करतात. परंतु काही महिला अशा प्रसंगांना धाडसाने सामोर जाऊन, त्यावर मात करून विजयश्री मिळवितात. यापैकीच एक आहे ममता गिरीपुंजे. ममताच्या आयुष्यात दोन वर्षांपूर्वी अतिशय दु:खद प्रसंग घडला. त्यांच्या पतीचे हृदयविकाराने अकाली निधन झाले. डोंगराएवढे संकट त्यांच्यापुढे उभे राहिले. निराश, हतबल झालेल्या ममताच्या आयुष्याचा पुढचा प्रवासच थांबला. उच्चशिक्षित असतानाही सर्वस्व हरविल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली. हळूहळू दिवस पुढे जात होते. दु:ख ओसरू लागले होते. मुलाचा चेहरा बघून मन खंबीर होत होते. सासू-सासऱ्यांनीही धीर दिला, आप्तस्वकियांनी पाठबळ दिले. ममता यांचे पतीची सुरक्षा एजन्सी चालवायचे. १८ ते २० सुरक्षा रक्षक त्यांच्या एजन्सीत कार्यरत होते. पतीच्या निधनामुळे सुरक्षा एजन्सीचे काम ठप्प पडले होते. ममता यांनी दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा सुरक्षा एजन्सीचे कार्य सांभाळण्याचा निर्णय घेतला. सर्वांच्या पाठबळामुळे पुरुषांच्या व्यवसायात तिने पदार्पण केले. ज्या संस्थेला त्यांची एजन्सी सुरक्षा प्रदान करायची. त्या संस्थेच्या मॅनेजरने सुरुवातीला थोडा नकारात्मक सूर आवळला. मात्र ममता यांनी एक संधी त्यांना मागितली. ही संधी मिळाल्यानंतर सुरक्षा पुरविण्याचे काम त्यांनी नेहमीप्रमाणे सुरू केले. ममताच्या संचालनात गेल्या दीड ते दोन वर्षात अशी कुठलीही तक्रार संस्थेला आली नाही. पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने एजन्सीचे काम होत असल्याची पावती ममताला मिळाली. सुरक्षा एजन्सी सांभाळण्याचे काम फार सोपे नाही. महिलांना तर ही जबाबदारी सांभाळणे अवघडच. सुरक्षा रक्षकाची मानसिकता लक्षात घेऊन काम करावे लागले. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेताना काहीसे कठोरही व्हावे लागले. त्यानुसार आपल्या स्वभावातही परिवर्तन केले. गार्डची ड्युटी लावणे, त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्रीबेरात्री भेटी देणे, संस्थाचालकाच्या अडचणी समजावून घेणे ही कामे करावी लागतात. शब्दांकन : मंगेश व्यवहारे
ममता देते सुरक्षाकवच
By admin | Published: October 22, 2015 4:31 AM