आॅनलाईन लोकमतनागपूर : शॉर्ट सर्किट होऊन उसाचे पीक जळाल्यामुळे काटोल तालुक्यातील एका शेतकऱ्याला एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने महावितरण कंपनीला दिला आहे.राजेंद्र बंदे असे शेतकऱ्याचे नाव असून, ते सोनोली येथील रहिवासी आहेत. या घटनेमुळे बंदे यांना शारीरिक व मानसिक त्रास झाला. त्यासाठी त्यांना १५ हजार रुपये मोबदला व तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये देण्यात यावे, असे निर्देशही मंचाने महावितरणला दिले आहेत. या निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मंचाचे अध्यक्ष शेखर मुळे व सदस्या चंद्रिका बैस यांनी हा निर्णय दिला असून, त्यामुळे शेतकऱ्यास छळनाऱ्या महावितरणला दणका बसला आहे.तक्रारीतील माहितीनुसार, बंदे यांच्याकडे चार हेक्टर शेती आहे. २०११-२०१२ मध्ये त्यांनी १.२० हेक्टर शेतात ऊस पिकाची लागवड केली होती. त्यांच्या शेतातून वीजवाहिनी गेली आहे. त्यावेळी वीजवाहिनीच्या तारा खाली लोंबकळत होत्या. त्यामुळे बंदे यांनी १६ नोव्हेंबर २०११ रोजी महावितरणच्या कार्यालयात तक्रार दिली होती. त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. दरम्यान, २२ फेब्रुवारी २०१२ रोजी वीजवाहिनीत शॉर्ट सर्किट होऊन ऊस पिकाला आग लागली. त्यात पिकाचे नुकसान झाले.घटनेच्या तक्रारीनंतर पोलीस व उपविभागीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर बंदे यांनी आवश्यक कागदपत्रांसह नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज केला, पण त्यांचा अर्ज महावितरणने फेटाळून लावला. परिणामी त्यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल करून दोन लाख ७० हजार रुपये नुकसान भरपाई, मानसिक व शारीरिक त्रासाचा मोबदला म्हणून ५० हजार रुपये तर, तक्रारीच्या खर्चापोटी ३० हजार रुपयांची मागणी केली होती. मंचाने विविध बाबी लक्षात घेता, वरीलप्रमाणे निर्णय दिला.महावितरणने आरोप फेटाळलेमहावितरणने स्वत:वरील आरोप फेटाळले होते. वीजवाहिनीत शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची व त्यामुळे उसाचे पीक जळाल्याची बाब कंपनीने अमान्य केली होती. सुकलेली पाने जळाल्यामुळे उसाच्या पिकाला आग लागली. त्याला कंपनीचा हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा कारणीभूत नाही, असा दावा मंचासमक्ष करण्यात आला होता तसेच तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली होती.
असा आहे मंचाचा निष्कर्षकाटोल तहसीलदारांनी ४ सप्टेंबर २०१२ रोजी दिलेल्या प्रमाणपत्रात उसाच्या पिकाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून २ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. महावितरणचे उप-अभियंता यांचा पाहणी अहवाल व तहसीलदारांचे प्रमाणपत्र यांचा विचार केल्यास शेतातील वीज वाहिनीखाली उसाचे पीक होते व वीज वाहिनीच्या तारा लोंबकळत होत्या हे स्पष्ट होते. तहसीलदारांच्या प्रमाणपत्रावर महावितरणने आक्षेप घेतला नाही. परिणामी एकंदर परिस्थितीचा विचार करता उसाच्या पिकाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असा निष्कर्ष निघतो असे मंचाने निर्णयात म्हटले आहे.