लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय महार्गासाठी जागा अधिग्रहीत करण्यात आलेल्या नागपूर (ग्रामीण )मधील मौजा-येरला येथील वैयक्तिक व शासकीय मालमत्तेचे मुल्यमापन करून प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
महामार्गासाठी जागा अधिग्रहीत करण्यात आलेल्या मालमत्ताधारकांना मोबदला मिळण्यासंदर्भात १४ मे रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याशी त्यांच्या कक्षात पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच व येथील नागरिकांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली होती. यावेळी प्रकरण तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्याप मालमत्ताधारकांना कोणत्याही प्रकराचा मोबदला देण्यात आलेला नाही. यावर तातडीने कार्यवाही करावी. जोपर्यत मुल्यांकन होत नाही तोपर्यंत महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी मौजा-येरला येथील रस्ता रुंदीकरणाकरीता कोणत्याही वैयक्तीक व शासकीय मालमत्तेचे नुकसान करू नये, अशा स्वरुपाचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात यावे, अशी मागणी कुंदा राऊत यांनी केली आहे. दरम्यान महामार्गामुळे बाधित होणाऱ्या मालमत्तांचा संबंधितांना मोबदला मिळत नाही. तोपर्यंत येथील कामाला मंजुरी देवू नये, अशी भूमिका येरला येथील ग्रामस्थांनी घेतली आहे.