लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे प्रवासी स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मरण पावला तरी, भरपाई नाकारता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला.तिवसा, जि. अमरावती येथील आकाश ठाकूर २९ जानेवारी २०१४ रोजी रेल्वेने नागपूर ते चांदूररेल्वे असा प्रवास करीत होता. रेल्वे डब्यात गर्दी असल्यामुळे तो दारात उभा होता. दरम्यान, अचानक धक्का लागल्यामुळे तो खाली कोसळून मरण पावला. पंचनाम्यात त्याच्याकडे रेल्वे तिकीट आढळून आले नाही. परिणामी, रेल्वे दावा न्यायाधिकरणाने आकाशचे आई-वडील मेघा व विजय ठाकूर यांचा भरपाईचा दावा खारीज केला होता. त्या निर्णयाविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील पुरावे व सर्वोच्च न्यायालयाचे विविध आदेश लक्षात घेता हा सुधारित निर्वाळा दिला.प्रवाशाने रेल्वे डब्ब्याच्या दारात उभे राहणे ही फौजदारी कृ ती नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन भरपाई देण्याच्या जबाबदारीतून मुक्त होत नाही. करिता असा प्रवासी स्वत:च्या निष्काळजीपणामुळे खाली पडून मरण पावल्यास भरपाई नाकारली जाऊ शकत नाही. तसेच, मयत प्रवाशाकडे रेल्वेचे अधिकृ त तिकीट आढळून आले नाही तरी, भरपाई देणे आवश्यक आहे. कारण, अपघात झाल्यानंतर प्रवाशाकडील रेल्वे तिकीट हरवले जाऊ शकते, असे उच्च न्यायालयाने हा निर्वाळा देताना स्पष्ट केले.आठ लाख रुपये भरपाई मंजूरउच्च न्यायालयाने या निर्णयाद्वारे मेघा व विजय ठाकूर यांना आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली. त्यांना ही रक्कम चार महिन्यात अदा करण्यात यावी, असे निर्देश केंद्र सरकारला देण्यात आले. तसेच, रेल्वे दावा न्यायाधिकरणाचा अवैध निर्णय रद्द करण्यात आला.