चालत्या रेल्वेत बसताना मृत्यू झाला म्हणून भरपाई नाकारता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2023 08:00 AM2023-02-04T08:00:00+5:302023-02-04T08:00:02+5:30

Nagpur News प्रवाशाचा चालत्या रेल्वेत बसताना खाली पडून मृत्यू झाला म्हणून त्याच्या वारसदारांना भरपाई नाकारता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

Compensation cannot be denied on the ground that death occurred while riding in a moving train | चालत्या रेल्वेत बसताना मृत्यू झाला म्हणून भरपाई नाकारता येणार नाही

चालत्या रेल्वेत बसताना मृत्यू झाला म्हणून भरपाई नाकारता येणार नाही

Next
ठळक मुद्दे वारसदारांना आठ लाख रुपये भरपाई मंजूर

राकेश घानोडे

नागपूर : प्रवाशाचा चालत्या रेल्वेत बसताना खाली पडून मृत्यू झाला म्हणून त्याच्या वारसदारांना भरपाई नाकारता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

एका महिला प्रवाशाचा चालत्या रेल्वेत बसताना खाली पडून मृत्यू झाल्यामुळे मध्य रेल्वेने पीडित वारसदारांना भरपाई देण्यास हरकत घेतली होती. रेल्वे कायद्यानुसार ही दुर्दैवी घटना नाही. प्रवाशाने स्वत:हून अपघात करून घेतला. त्यामुळे रेल्वे भरपाई देण्यास जबाबदार नाही, असा दावा न्यायालयात करण्यात आला होता. न्यायालयाने हे मुद्दे बेकायदेशीर ठरविले.

प्रवाशाने स्वत:हून अपघात करून घेतला हे मान्य करण्यासाठी प्रवाशाचा तसा उद्देश होता, हे आधी सिद्ध करणे आवश्यक आहे. प्रकरणातील प्रवाशाने आत्महत्या केली, असे रेल्वेचे म्हणणे नाही. त्यामुळे अशा प्रकरणांत रेल्वेची काहीही चूक नसली तरी मृताच्या वारसदारांना भरपाई देणे बंधनकारक आहे, असे न्यायालयाने सांगितले. दीपलक्ष्मी बांधे (५०) असे मृत प्रवाशाचे नाव होते. त्या नागपूर येथील रहिवासी होत्या. न्यायालयाने त्यांच्या वारसदारांना आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली.

१७ वर्षांपूर्वी घडली घटना

ही घटना १७ वर्षांपूर्वी वर्धा रेल्वे स्थानक येथे घडली. प्रवासी महिलेला १२ फेब्रुवारी २००६ रोजी अमरावती-नागपूर पॅसेंजरने वर्धा येथून नागपूरला यायचे होते. त्या फलाटावर पोहोचण्यापूर्वीच रेल्वे चालायला लागली. त्यामुळे त्या पुलावरून धावत येऊन रेल्वेत बसताना खाली कोसळल्या व रेल्वेखाली आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

रेल्वे तिकिटाचा मुद्दाही खारीज

प्रवासी महिलेकडे रेल्वेचे तिकीट नव्हते. त्यामुळे तिचे वारसदार भरपाईसाठी अपात्र आहेत, असा मुद्दा देखील रेल्वेने उपस्थित केला होता. न्यायालयाने तो मुद्दाही खारीज केला. केवळ रेल्वे तिकीट मिळाले नाही म्हणून प्रवासी तिकिटाशिवाय रेल्वे प्रवास करीत होती, असे म्हणता येणार नाही. अपघातानंतर तिकीट हरवले जाऊ शकते, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.

कायद्यात दुर्दैवी घटनेची व्याख्या

रेल्वे कायद्यातील कलम १२३ (सी) मध्ये दुर्दैवी घटनेची व्याख्या देण्यात आली आहे. त्यानुसार, प्रवासी रेल्वेत, रेल्वे प्रतीक्षा कक्षात, आरक्षण व बुकिंग कार्यालयात, फलाटावर किंवा इतर रेल्वे परिसरात दहशतवादी घातपात घडणे, हिंसक हल्ला घडणे, दरोडा पडणे, दंगल, गोळीबार, जाळपोळ होणे किंवा रेल्वेतून प्रवासी खाली पडणे या घटना दुर्दैवी घटना आहेत.

Web Title: Compensation cannot be denied on the ground that death occurred while riding in a moving train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.