रेल्वे अपघातात आठ लाखाची भरपाई मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 08:15 PM2019-02-14T20:15:49+5:302019-02-14T20:16:27+5:30
रेल्वे अपघातामुळे मृत्यू झालेल्या तरुणाच्या पालकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली. न्या. अतुल चांदूरकर यांनी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे अपघातामुळे मृत्यू झालेल्या तरुणाच्या पालकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली. न्या. अतुल चांदूरकर यांनी हा निर्णय दिला.
मनोज पातोडे असे मयत तरुणाचे नाव असून तो नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती येथील रहिवासी होता. २ एप्रिल २००९ रोजी रेल्वे दावा न्यायाधीकरणने मनोजचे पालक मधुकर व कांताबाई यांना चार लाख रुपये भरपाई मंजूर केली होती. त्या निर्णयाविरुद्ध मध्य रेल्वेने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, रेल्वेचे अपील फेटाळून लावले व २२ डिसेंबर २०१६ रोजीच्या अधिसूचनेनुसार भरपाई वाढवून आठ लाख रुपये केली. पीडितांना उर्वरित रक्कम अदा करण्यासाठी रेल्वेला आठ आठवड्याची मुदत देण्यात आली. ही घटना १७ जानेवारी २००५ रोजी घडली होती. भुसावळ-वर्धा पॅसेंजरने प्रवास करीत असताना मनोज तळणी रेल्वेस्थानकावर रेल्वेतून खाली पडला. त्यामुळे गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. न्यायालयात रेल्वेतर्फे अॅड. नितीन लांबट तर, पातोडेतर्फे अॅड. अनिल बांबल यांनी कामकाज पाहिले.