निष्काळजीपणा असला तरी भरपाई द्यावी लागेल; हायकोर्टाचा निर्वाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 10:32 AM2020-02-29T10:32:14+5:302020-02-29T10:32:47+5:30
रेल्वे प्रवाशाचा त्याच्या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मृत्यू झाला तरी, वारसदारांना भरपाई द्यावीच लागेल असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला.
राकेश घानोडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे प्रवाशाचा त्याच्या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मृत्यू झाला तरी, वारसदारांना भरपाई द्यावीच लागेल असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला. हा निर्णय रेल्वे अपघात पीडितांसाठी उपयोगी सिद्ध होणार आहे.
फिरदौस कौसर या ४ फेब्रुवारी २०१० रोजी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपुरातील अजनी येथून बडनेराला जात होत्या. धावत्या रेल्वेतून खाली पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे रेल्वेचे अधिकृत तिकीट होते. त्यामुळे वारसदार अब्दुल रशीद व परवीन बानो यांनी भरपाईसाठी रेल्वे दावा न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. न्यायाधिकरणने ४ आॅगस्ट २०१५ रोजी तो अर्ज फेटाळून लावला. फिरदौस कौसर या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे रेल्वेतून खाली पडल्या. परिणामी, भरपाई देता येणार नाही असे या वादग्रस्त निर्णयात नमूद करण्यात आले. त्याविरुद्ध वारसदारांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
उच्च न्यायालयाने ते अपील मंजूर करून न्यायाधिकरणचा वादग्रस्त निर्णय रद्द केला. तसेच, वरीलप्रमाणे भूमिका मांडून वारसदारांना चार महिन्यात आठ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश मध्य रेल्वेला दिला.
ही फौजदारी कृती नव्हे
रेल्वे प्रवाशाने निष्काळजीपणा करणे ही फौजदारी कृती नव्हे. त्यामुळे निष्काळजीपणाच्या कारणावरून वारसदारांना भरपाई नाकारता येणार नाही. प्रवासी रेल्वेतून खाली उतरताना किंवा रेल्वेत चढताना खाली पडणे ही दुर्दैवी घटना आहे. करिता वारसदार भरपाईस पात्र ठरतात असे उच्च न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले.