नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसदारांना ९ लाख ४५ हजार रुपये भरपाई मंजूर केली. न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी हा निर्णय दिला. ही भरपाई बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने द्यायची आहे.
ज्ञानेश्वर ढोरे असे मृताचे नाव होते. ते अकोला येथील रहिवासी होते. १३ मे २००८ रोजी मोटार अपघात दावा न्यायाधिकरणने ढोरे यांच्या पत्नी अनुराधा व दोन मुलांना तीन लाख रुपये भरपाई मंजूर केली होती. इन्शुरन्स कंपनीने त्या निर्णयाविरुद्ध, तर अनुराधा व मुलांनी भरपाई वाढवून मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ढोरे यांच्या उपचारावर तीन लाख रुपये खर्च झाले. ढोरे शेती करीत होते. त्यातून सुमारे दीड लाख रुपये उत्पन्न होत होते. संपूर्ण कुटुंब त्यांच्यावर अवलंबून होते. त्यामुळे भरपाई वाढवून देण्यात यावी, अशी विनंती अनुराधा व मुलांनी उच्च न्यायालयाला केली होती. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेत, अनुराधा व मुलांचे अपील मंजूर करून भरपाई वाढवून दिली. तसेच, इन्शुरन्स कंपनीचे अपील खारीज केले. ही घटना ९ ऑगस्ट २००५ रोजी घडली होती. ऑटो रिक्षाने धडक दिल्यामुळे ढोरे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर २४ फेब्रुवारी २००६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.