आमटे दाम्पत्याचे थक्क करणारे अनुभव ऐकून वकील भारावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 09:27 PM2018-10-29T21:27:02+5:302018-10-29T21:33:52+5:30
हळूहळू सर्वच क्षेत्रातील सेवाभाव संपत चालला असून व्यावसायिकतेला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. वकिली व्यवसायही त्याला अपवाद नाही. पूर्वी वकिली व्यवसाय सेवाभावी वृत्तीने केला जात होता. वर्तमान काळात त्याची वानवा भासायला लागली आहे. सध्याची परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात हे क्षेत्र केवळ पैसे कमावण्याचा अड्डा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे होऊ नये व वकिलांच्या मनात सेवेची भावना सतत कायम रहावी यासाठी हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने ‘जीवनाचा नवीन मार्ग’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यांतर्गत सोमवारी प्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. त्यांच्या थक्क करणाऱ्या जीवन प्रवासातून वकिलांना सेवेची प्रेरणा मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हळूहळू सर्वच क्षेत्रातील सेवाभाव संपत चालला असून व्यावसायिकतेला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. वकिली व्यवसायही त्याला अपवाद नाही. पूर्वी वकिली व्यवसाय सेवाभावी वृत्तीने केला जात होता. वर्तमान काळात त्याची वानवा भासायला लागली आहे. सध्याची परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात हे क्षेत्र केवळ पैसे कमावण्याचा अड्डा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे होऊ नये व वकिलांच्या मनात सेवेची भावना सतत कायम रहावी यासाठी हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने ‘जीवनाचा नवीन मार्ग’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यांतर्गत सोमवारी प्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. त्यांच्या थक्क करणाऱ्या जीवन प्रवासातून वकिलांना सेवेची प्रेरणा मिळाली.
डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी यांनी बाबा आमटे यांच्याकडून प्रेरणा घेऊन शून्यातून विश्व निर्माण केले आहे. हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प त्याची प्रचिती देतो. परंतु, आज जे चित्र दिसत आहे ते त्या काळात नव्हते. आमटे दाम्पत्याने मुलाखतीमध्ये त्यावेळच्या परिस्थितीची माहिती दिल्यानंतर सर्वचजण थक्क झाले. डॉ. प्रकाश यांनी बाबांचे सेवाकार्य पुढे नेण्याचा संकल्प केल्यानंतर त्यांना आदिवासींची सेवा करण्यास सांगण्यात आले होते. त्यासाठी सरकारने त्यांना हेमलकसा येथे ५० एकर जागा दिली. त्यावेळी या भागात रोड, वीज, घरे इत्यादी काहीच सुविधा नव्हत्या. अशा परिस्थितीत आमटे दाम्पत्याने विविध अडचणी व संकटांना तोंड देऊन आदिवासी सेवेचे नवीन जग तयार केले. सेवेचा एकमेव विचार डोक्यात असल्यामुळे त्यांनी व त्यांच्या सहकाºयांनी अडचणींचा पाढा कधीच वाचला नाही. समोर येणाºया आव्हानांवर मात करीत ते सतत चालत राहिले.
लोक बिरादरी प्रकल्पामध्ये आरोग्य सेवा सुरू केल्यानंतर आमटे दाम्पत्याला सर्वप्रथम आदिवासींचे मन वळविण्याचे कार्य करावे लागले. त्यापूर्वी आदिवासी कधीच डॉक्टरकडे गेले नव्हते. त्यांचा तंत्रमंत्र पद्धतीवर विश्वास होता. ते आजार बरा होण्यासाठी बळी देत होते. नरबळीचीही प्रथा होती. त्यामुळे आमटे दाम्पत्याकडे कुणीच उपचारासाठी येत नव्हते. परंतु, त्यांनी मृत्यूशय्येवरील काही रुग्णांना बरे केल्यानंतर आदिवासींचा त्यांच्यावर विश्वास बसला. रुग्णांची संख्या वाढायला लागली.
आमटे दाम्पत्याने आदिवासींची सेवा सुरू केली त्यावेळी त्यांच्याकडे निश्चित आराखडा नव्हता. ते सेवा करीत राहिले व त्यांच्या कार्याचा आपोआप विस्तार होत गेला. त्यांच्याकडून उपचार करून गेलेल्या एका रुग्णाचा अंधत्वामुळे मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर त्यांनी डोळ्यांवर उपचार सुरू केले. अज्ञानामुळे आदिवासींची जागोजागी फसवणूक होत असल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी शाळा सुरू केली. त्यांच्या शाळेतील अनेक विद्यार्थी डॉक्टर, अभियंते, वकील व शिक्षक झाले आहेत. आदिवासींना त्यांच्या अधिकारांबाबत जागृत करण्याचे व त्यांच्यातील वाद सामंजस्याने सोडविण्याचे कार्यही त्यांनी सुरू केले. अशाप्रकारे ते आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरिता झटायला लागले.
श्वेता शेलगावकर यांनी आमटे दाम्पत्याची मुलाखत घेतली. संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्षा अॅड. गौरी वेंकटरमण यांनी मानपत्राचे वाचन केले तर, सचिव अॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी आभार मानले.
प्रकल्पाला दीड लाखाची देणगी
संघटनेच्या वतीने लोक बिरादरी प्रकल्पाला दीड लाख रुपयांची देणगी देण्यात आली. मुलाखतीनंतर आमटे दाम्पत्याचा सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर व ज्येष्ठ अधिवक्ता कुमकुम सिरपूरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.