नागपूर : महापालिकेचे उद्यान अधीक्षक अमाेल चाैरपगार यांच्याविरुद्ध पर्यावरण कार्यकर्त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(एसीबी)कडे तक्रार केली आहे. अजनीवन, अंबाझरी उद्यान आणि निर्मलनगरी परिसरात झालेल्या अवैध वृक्षताेड प्रकरणात चाैरपगार यांची भूमिका संशयास्पद असल्याचा गंभीर आराेप तक्रारकर्त्यांनी केला आहे.
पर्यावरण कार्यकर्ते जाेसेफ जाॅर्ज, कुणाल माैर्य, अनिकेत कुत्तरमारे, राेहन अरसपुरे व इतरांनी ही तक्रार एसीबीचे अधीक्षक तसेच झाेन ४ चे उपायुक्त यांना दिली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार पहिले प्रकरण अजनी परिसरातील आहे. येथे आयएमएस प्रकल्पाचे कंत्राट असलेल्या नागार्जुना कंपनीने परवानगी न घेता अजनी परिसरातील झाडे कापली. याबाबत तक्रार केल्यानंतरही उद्यान विभागाने कुठलीही कारवाई केली नाही. अंबाझरी उद्यानातही विकास कामासाठी परवानगीपेक्षा चारपट झाडे कापण्यात आली. विशेष म्हणजे ही झाडे जेसीबीने ताेडून वादळाने पडल्याचे भासविण्यात आले. मनपाच्या उद्यान विभागाने या अवैध वृक्षताेडीकडेही दुर्लक्ष केले. निर्मलनगरी परिसरात कंत्राटदाराने फ्लॅट स्कीमसाठी परवानगी न घेता १८७ झाडे ताेडण्यात आली. मात्र नाेटीस बजावून कारवाईचा देखावा करण्यापलीकडे काहीही करण्यात आले नाही.
या तक्रारीमध्ये भांडेवाडी येथे वृक्षाराेपणाचे दिलेले कंत्राट, अंबाझरी तलाव राेड, शेवाळकर बिल्डिंगसमाेर झालेली वृक्षताेड आणि अजनी भागात रेल्वे क्वाॅर्टरच्या बांधकामासाठी २०० च्यावर झाडांची अवैध कटाई करण्यात आली. या प्रकरणातही उद्यान अधीक्षकांची भूमिका संशयास्पद असून, माेठा भ्रष्टाचार झाल्याचा आराेप करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांची सखाेल चाैकशी करून दाेषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.