कोराडी जनता दरबार : पालकमंत्र्यांनी सलग सहा तास ऐकून घेतल्या अडचणी नागपूर : कोराडी येथे रविवारी आयोजित पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबारात तब्बल ६०० वर नागरिकांनी आपल्या तक्रारी सादर केल्या. सलग सहा तास चाललेल्या या जनता दरबारात पालकमंत्र्यांनी सर्व नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत निवेदन स्वीकारले. तसेच प्रत्येकाच्या अर्जावर विविध कारवाईदर्शक सूचना लिहिल्या. तर काही प्रकरणात अधिकाऱ्यांना कामे करण्याचे थेट निर्देश दिले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आमदार म्हणून निवडून आले तेव्हापासून कोराडीत जनता दरबार घेत आहेत. मंत्री झाल्यानंतरही त्यांचा हा जनता दरबार नियमितपणे सुरू आहे. रविवारी सकाळी ९ ते दुपारी २ ही जनता दरबाराची वेळ होती. परंतु दुपारी ३ वाजेपर्यंत नागरिकांचे येणे सुरूच होते. सहा तास सलग चाललेल्या या जनता दरबारात पालकमंत्र्यांनी प्रत्येकाची तक्रार काळजीपूर्वक ऐकून घेतली आणि त्याच्या अर्जावर कारवाईबाबत सूचना लिहून ते पुढील कार्यवाहीसाठी पाठविले. काही जणांची कामे तातडीने होण्यासारखी असल्यास ती त्यांनी तेव्हाच करण्याचे निर्देश दिले. जे काम होऊच शकत नाही, अशांना पोकळ आश्वासन न देता त्यांना स्पष्टपणे काम होत नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
६०० वर नागरिकांनी मांडल्या तक्रारी
By admin | Published: September 07, 2015 3:03 AM