लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपच्या बनावट लेडरहेडचा वापर करून पोलिसात तक्रार करण्यात आली. बुधवारी या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस काही भाजप कार्यकर्त्यांच्या घरी गेले असता, हा प्रकार उघडकीस आला.
अज्ञात आरोपीने भाजपा मध्य नागपूरच्या बनावट लेटरहेडवर पोलीस आयुक्त आणि पाचपावली पोलीस ठाणे परिसरात अवैध धंदे असल्याची तक्रार केली. या लेटरहेडवर १० लोकांची नावे देण्यात आली होती. त्यांचे जुगार अड्डे व अवैध धंदे असल्याचे सांगितले हाेते. या आधारावर पाचपावली पोलीस आणि गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी संबंधित लोकांच्या घरी धाड घातली. तेव्हा पोलिसांना कारवाईदरम्यान कुठलीही आपत्तीजनक वस्तू सापडली नाही. या कारवाईच्या घेऱ्यात आलेले काही लोक भाजपशी जुळलेले होते. अचानक कारवाई झाल्याने ते सुद्धा आश्चर्यचकित झाले. त्यांनी नेत्यांना याची तक्रार केली. त्यानंतर भाजपचे मध्य नागपूरचे अध्यक्ष किशोर पलांदूरकर यांनी पााचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पक्ष कार्यकर्त्यांना बदनाम करण्यासाठी बनावट लेटरहेडचा वापर करून तक्रार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. मनपा निवडणूक जवळ येत असल्याने या प्रकारच्या घटना वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पक्षांतर्गत स्पर्धेतूनही असे प्रकार होत असल्याची शक्यताही आहे.