नागपूर : अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक सर्व कामे पावसाळ्याआधी गतीने पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी बुधवारी दिले. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उच्चस्तरीय समितीची सहावी बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीस विभागीय आयुक्त बिदरी या दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. बैठकीस समितीचे सदस्य सचिव तथा मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, सदस्य जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता पी.के.पवार, मनपाच्या अधिक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, उपायुक्त प्रदीप कुळकर्णी यांच्यासह महामेट्रोरेल, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदी विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी हाती घेण्यात आलेली कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी विविध यंत्रणांच्या समन्वयाद्वारे समितीने सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजनांना केल्या आहेत. यानुसार पहिल्या टप्प्यातील कामानंतर दुसऱ्या टप्प्या अंतर्गत या धरणाच्या जवळपास ४२ हजार क्युबिक मीटर वर मातीबांध बळकटीकरणाचे कामे अंतिम टप्प्यात असून ही कामे पावसाळ्याआधीच पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी बिदरी यांनी जलसंपदा विभागाला दिले.
-अंबाझरी धरणाच्या सांडव्यावरून वाहणारा विसर्ग व्यवस्थितरित्या वाहून जाण्यासाठी नवीन पूल बांधण्याचे काम सुरु झाले आहे. पुलाचे बांधकाम करताना वीज वाहिन्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण यांनी समन्वयाने पूर्ण करावीत.
- धरणाच्या प्रवाहाला अडथडा निर्माण करणारी अतिक्रमन तातडीने काढा.- परिसरातील नाग नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाची कामे, नाले सफाई आदी कामांनाही वेग देऊन पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा.