लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीतील मेडिकलमध्ये येत्या दोन वर्षांत स्वतंत्र कॅन्सर रुग्णालय कार्यान्वित करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनास दिला. यासाठी न्यायालयाने शासनाला कालबद्ध कार्यक्रम ठरवून दिला आहे. येत्या दोन महिन्यांत स्वतंत्र कॅन्सर रुग्णालय उभारण्यासाठी लागणाऱ्या सर्व मंजुऱ्या मिळविण्यात याव्यात, त्यापुढील तीन महिन्यांत रुग्णालयाच्या इमारतीचा आराखडा अंतिम करण्यात यावा आणि त्यानंतर १८ महिन्यांमध्ये रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करावे व आवश्यक उपकरणे खरेदी करण्यात यावीत असे शासनाला सांगण्यात आले आहे. काय होते याचिकाकर्त्याचे म्हणणे भारतामध्ये कॅन्सर वेगाने वाढत आहे. २०१२ मध्ये देशभरात ६ लाख ८२ हजार ८३० कॅन्सरग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला होता. पुरुषांमध्ये फुफ्फुस, तोंड, अन्ननलिका व पोटाच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. त्यात नागपूर हे मुंबई, पुणे व औरंगाबादच्या तुलनेत फार पुढे आहे. त्यामुळे नागपुरात स्वतंत्र कॅन्सर रुग्णालय उभारणे आवश्यक आहे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. रेडिओथेरपीच्या दोन जागांना मंजुरी मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने मेडिकलमधील एम. डी. (रेडिओथेरपी) अभ्यासक्रमासाठी दोन जागांना नुकतीच मंजुरी दिली. त्यामुळे याचिकाकर्त्याची यासंदर्भातील तक्रारही संपुष्टात आली. राज्यातील १६ पैकी केवळ ४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत रेडिओथेरपी सेंटर्स आहेत. त्यापैकी एक नागपुरात आहे. एमसीआयची मान्यता नसताना एम. डी. (रेडिओथेरपी) अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. हा प्रश्न आता निकाली निघाला.
दोन वर्षांत पूर्ण करा कॅन्सर रुग्णालय
By admin | Published: June 22, 2017 1:55 AM