कस्तुरचंद पार्कमधील विकास कामे ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा : हायकोर्टाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 01:02 AM2020-07-01T01:02:19+5:302020-07-01T01:03:48+5:30
शहराच्या हृदयस्थळी असलेल्या हेरिटेज कस्तुरचंद पार्क परिसरात सुरू असलेली विविध विकास कामे येत्या ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात यावीत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी महानगरपालिकेला दिला. तसेच, येत्या दोन आठवड्यात सर्व खड्डे बुजवून मैदान समांतर करण्यात यावे व काही अतिक्रमण वाचले असल्यास तेही हटविण्यात यावे, असे सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराच्या हृदयस्थळी असलेल्या हेरिटेज कस्तुरचंद पार्क परिसरात सुरू असलेली विविध विकास कामे येत्या ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात यावीत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी महानगरपालिकेला दिला. तसेच, येत्या दोन आठवड्यात सर्व खड्डे बुजवून मैदान समांतर करण्यात यावे व काही अतिक्रमण वाचले असल्यास तेही हटविण्यात यावे, असे सांगितले.
प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. २७ एप्रिल २०१७ रोजी न्यायालयाने कस्तुरचंद पार्कवरील व आजूबाजूचे अतिक्रमण तात्काळ हटविण्याचा आदेश महानगरपालिकेला दिला होता. या कारवाईसाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते. तसेच, कस्तुरचंद पार्कवर परत अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले होते. असे असताना महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने जबाबदारीला न्याय दिला नाही. त्यांच्या दुर्लक्षामुळे कस्तुरचंद पार्कची दुरवस्था झाली. मैदानावर झाडेझुडपे वाढली. मैदानावरील स्मारकामध्ये अतिक्रमण करण्यात आले. परिणामी, १९ जून रोजी उच्च न्यायालयाने महानगरपालिका व पोलीस प्रशासनाला फटकारले होते. न्यायालय हे कायदे व जनहिताचे संरक्षक असते. ते अशा परिस्थितीकडे मूकदर्शक होऊन बघत राहू शकत नाही, असे परखड निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. त्यानंतर मनपा व पोलिसांनी तातडीने अतिक्रमण हटवले. परंतु, मैदानावरील खड्डे व झाडेझुडपे कायम आहेत. विकास कामांमुळे मैदानाची दुरवस्था झाली आहे. अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी याचिकेचे तर, अॅड. जेमिनी कासट यांनी मनपातर्फे कामकाज पाहिले.