लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढती विजेची मागणी आणि सार्वजनिक सुविधांसाठी होणाऱ्या वीज बिलाच्या खर्चाची बचत व्हावी या दृष्टीने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील गावखेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या नळयोजना सौर ऊर्जेवर घेण्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आणि सकारात्मक निर्णयामुळे पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर घेणे शक्य झाले आहे. आजमितीला राज्यातील विविध जिल्ह्यात १३२० सौर नळयोजनांची कामे पूर्ण झाली आहेत.ग्रामीण भागात आणि पाच हजार लोकवस्तीच्या मोठ्या ग्रामपंचायतींअंतर्गत असलेल्या नळयोजनांकडे वीजबिलाची थकबाकी खूप वाढली. थकबाकीपोटी अनेक योजनांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला. यावर उपाययोजना म्हणून पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर घेण्याची संकल्पना ऊर्जामंत्र्यांनी पुढे आणली आणि त्यादृष्टीने महाऊर्जाने प्रयत्न केले. परिणामी एकापाठोपाठ एक अशा नळयोजना आता सौर ऊर्जेवर घेण्यात येत आहेत. त्यामुळे नळयोजनांपुढील वीजबिलाची समस्या संपुष्टात येणार आहे आणि नळयोजनांना लागणाºया विजेची बचत होऊन ती वीज अन्य ग्राहकांकडे वळती करता येणे शक्य होईल.राज्यात पुणे विभागाला १७८ नळयोजनांचे लक्ष्य दिले होते. यापैकी १४३ योजना पूर्ण झाल्या असून ३६ योजनांची कामे सुरू आहेत. औरंगाबाद विभागात १५८ पैकी १३० नळयोजनांचे काम पूर्ण झाले आहे. २८ योजनांची कामे सध्या विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत. नाशिक विभागात १९६ पैकी १७६ नळयोजना पूर्ण झाल्या असून २० योजनांचे काम सुरू आहे. अकोला विभागात १२२ नळयोजनांपैकी ११० पूर्ण झाल्या असून १२ योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. चंद्रपूर विभागात ८५ पैकी ७७ योजनांची कामे पूर्ण झाली असून आठ योजनांची कामे सुरू आहे. कोल्हापूर विभागात १६६ योजनांच्या लक्ष्यापैकी फक्त ३६ योजनांची कामे पूर्ण झाली असून कोल्हापूर विभाग माघारला असल्याचे दिसते. १३० योजना प्रलंबित आहेत. अमरावती विभागात ८७ पैकी ६६ नळयोजनांची कामे पूर्ण झाली आहे. २१ योजनांची कामे प्रलंबित आहेत. मुंबई विभागात १४८ योजनांपैकी १३८ योजनांची कामे पूर्ण झाली तर १० नळयोजनांची कामे सुरू आहेत. लातूर विभागात १८० पैकी १२५ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. ५५ नळ योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. नागपूरमध्ये ३७६ पैकी ३२० सौर नळ योजनांची कामे पूर्ण झाली असून ५६ नळयोजनांची कामे प्रगतिपथावर आहेत.राज्यातील एकूण १५१५ नळयोजनांपैकी ११७२ नळयोजना पूर्ण झाल्या असून १८५ नळयोजनांची कामे प्रगतिपथावर आहेत, तर १५८ नळ योजनांची कामे प्रलंबित आहेत.