नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा दुसरा वर्धापनदिन : ८७ टक्के जमीन अधिग्रहित नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा दुसरा वर्धापनदिन शनिवारी हॉटेल सेंटर, रामदासपेठ येथे भव्य समारंभात साजरा करण्यात आला. या समारंभात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, प्रकल्प संचालक महेश कुमार, रोलिंग स्टॉक व सिस्टीम संचालक सुनील माथूर, वित्त संचालक सी. शिवमाथन, कार्यकारी संचालक रामनाथ, वित्त आणि प्रशासन प्रमुख अनिल कोकाटे, उपमहाप्रबंधक (जनसंपर्क व समन्वय) शिरीष आपटे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. २२ मेट्रो स्थानकांचे बांधकाम सुरू बृजेश दीक्षित म्हणाले, दोन वर्षांपूर्वी नागपूर मेट्रो रेल्वेची सुरुवात एक डीपीआर बुकच्या आधारावर झाली. पूर्वी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी आणि आता महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) असा बदल झाला. लोकांच्या सहकार्याने नागपूर मेट्रो रेल्वेचे ३२ टक्के काम पूर्ण झाले असून ३८ पैकी २२ मेट्रोस्थानक आणि ३८ पैकी २२ कि़मी. मेट्रो रेल्वे मार्गाचे बांधकाम सुरू आहे. कामाच्या वेगामुळे हा प्रकल्प डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी) ‘मेट्रो कोच’च्या प्रतिकृतीचे लोकार्पण मेट्रो रेल्वे प्रकल्पाची माहिती लोकांना देण्याच्या उद्देशाने कस्तूरचंद पार्क येथे उभारण्यात आलेले माहिती केंद्र अर्थात ‘मेट्रो कोच’च्या प्रतिकृतीचे लोकार्पण बृजेश दीक्षित यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी ज्योती दीक्षित उपस्थित होत्या. दीक्षित म्हणाले, नागपूर मेट्रो प्रकल्पाची माहिती ‘मेट्रो कोच’ या माहिती केंद्रात उपलब्ध राहील.माहिती केंद्र सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहील. मोबाईल अॅपच्या माध्यमातून लोकांना माहिती मिळणार आहे. केंद्रात तीन टीव्ही असून ब्रोशर, माहिती फलक, वॉटर कूलर, टेलिफोन आदी सुविधा आहेत. दीक्षित यांनी ‘मेट्रो कोच’च्या प्रतिकृतीत एसी कोच प्रवासाचा आनंद अनुभवला. सर्वस्तरातील लोकांना मिळणार सेवा नागपूर मेट्रोकडे लोकांचा ओढा आणि अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. सर्वस्तरातील लोकांना मेट्रो सेवेचा लाभ मिळणार आहे. सर्वांधिक भर गुणवत्तेचे बांधकाम आणि सुरक्षेवर आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मार्गदर्शन आणि देखरेखीखाली तांत्रिक कार्य सुरू आहे. जूनमध्ये खापरी ते नवीन विमानतळापर्यंत मेट्रो रेल्वेची चाचणी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्तविक भाषणात शिरीष आपटे यांनी मेट्रोच्या विकास कार्याची माहिती दिली. यावेळी रायसोनी कॉलेजचे प्रा. विजय कपाई, बाळू राठोड, श्याम पांढरीपांडे आणि इतर मान्यवरांनी मेट्रोची प्रगती आणि जनजागृतीसाठी करण्यात येणाऱ्या कार्याची प्रशंसा केली. समारंभात छत्रपती उड्डाण पुलाच्या तोडकामाचे रेखांकन काढणाऱ्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. प्रश्नोत्तर सत्रात बृजेश दीक्षित यांनी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. रेणुका देशकर यांनी संचालन आणि आभार मानले.
दोन वर्षांत मेट्रो रेल्वेचे ३२ टक्के काम पूर्ण
By admin | Published: February 19, 2017 2:55 AM