चंद्रशेखर बावनकुळे : नऊ गावात ३ कोटी ६७ लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजननागपूर : कामठी विधानसभा मतदारसंघातील ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे, पण विजेचे कनेक्शन नाही, अशा सर्व शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी कनेक्शनचा अर्ज सरकारकडे करावा. येत्या जून २०१६ पर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी कनेक्शन देऊन बॅकलॉग पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. कामठी विधानसभा क्षेत्रातील आजनी येथे ५०.१९ लाख रुपये, गादा-३०.३१ लाख रुपये, नेरी - ५५.०४ लाख रुपये, उनगाव १५.२८ , सोनेगाव राजा ४०.२९, गुमथळा ६०.९२, आवंढी २०.२७, भोवरी १७.२८, कडोली ७५.२८ असे एकूण ३ कोटी ६६ लाख ८४ हजार रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्र्यंच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आजनी येथे १५ लाखाच्या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन, विजेच्या कामाच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी, ६० लाख रुपयाचे विजेचे खांब, १२ ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आले. एकूण ५० लाख १९ हजार रुपयांच्या कामाची सुरुवात करण्यात आली. नेरी या गावात १० लाख रुपयांचे ग्राम पंचायत भवन बांधण्यात येईल. १७ लाख रुपयांची विजेच्या देखभाल दुरुस्तीची कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. २ ट्रान्सफॉर्मर या गावात बसविण्यात येणार आहेत. याशिवाय १३ ट्रान्सफॉर्मरसाठी ५७ लाख रुपयांचा प्रस्ताव आहे. सोनेगाव राजा येथे अंतर्गत रस्त्यांसाठी १० लाख, ग्रामपंचायत भवनसाठी १० लाख रुपये देण्यात आले. गादा येथे १५ लाख रुपयांचा सिमेंट रस्ता, १२ लाख रुपयाचे ३ ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आले. गुमथळा गावात २० लाख रुपयाच्या रस्त्याचे भूमिपूजन, २० लाख रुपयाच्या ग्रामपंचायत भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन, विजेच्या देखभाल दुरुस्तीसाठी २१ लाख रुपये, तसेच ७ कोटीची कॅनॉलची कामे प्रस्तावित करण्यात आली. याप्रसंगी पं. स. सभापती अनिता चिकटे, जि. प. सदस्य विनोद पाटील, पं. स. सदस्य विमल साबळे, नरेश शेंडे, दिलीप मुळे, मधुकर ठाकरे, सरपंच माला इंगोले, अनिल निधान, रमेश चिकटे, योगेश वाडीभस्मे, राजकुमार घुले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कृषी पंप कनेक्शनचा बॅकलॉग पूर्ण करणार
By admin | Published: October 25, 2015 2:50 AM