लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: अॅट्रोसिटी कायद्यामध्ये फेर बदल करण्याचे जे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले ते अन्यायकारक असल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या भारत बंदला आज नागपुरात तीव्र तर उर्वरित विदर्भात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसले.नागपूर शहरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. संविधान चौकात रास्ता रोको करण्यात आला. इंदोरा चौकात बसला आग लावण्यात आली. गड्डीगोदाममध्ये रेल रोको करण्यात आली. अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड व दगडफेक करण्यात आली.
अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे हा कायदा शिथील झाला आहे. दलित-आदिवासींवर होणारे जातीय हल्ले व अत्याचार रोखण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला हा कायद्याचा उपयोगच संपला आहे, त्यामुळे दलित-आदिवासी समाजामध्ये न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रचंड असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर वाल्मिकी समाजने सोमवारी भारत बंदचे आवाहन केले होते. उत्तर भारतासह नागपुरातही या आंदोलनाला तीव्र प्रतिसाद मिळाला. याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या संविधान चौकात विविध संघटनांनी जोरदार आंदोलन करत नारेबाजी केली. इंदोर चौकात एक बस पेटवण्यात आली, तर एका बसवर दगडफेक करण्यात आली.काही भागात या बंदच्या निमित्ताने लोकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त सुद्धा लावला आहे. देशात असलेल्या अॅट्रॉसिटी कायद्यात बदल होऊ नये, अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे.यवतमाळात महादलित परिसंघाच्या नेतृत्वात यवतमाळ नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. तसेच मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात कुठेही बंद पाळण्यात आला नाही. सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते.चंद्रपूर जिल्ह्यात माजरी येथील आंबेडकर चौकात राष्ट्रीय महादलित परिसंघ, काँग्रेस पार्टी, भारिप बहुजन महासंघ आदी संघटनांचे कार्यकर्ते एकत्र जमले होते. भद्रावतीचे नायब तहसीलदार यांच्याकडे राष्ट्रपतींना पाठविण्यासाठी एक निवेदन देण्यात आले. ब्रह्मपुरी, सावली येथेही निवेदन देण्यात आले. सकाळच्या वेळेस काही तासांसाठी दुकाने बंद करण्यात आली होती. बल्लारपूर, वरोरा, नागभीड, सिंदेवाही, मूल, चिमूर येथे बंदचा प्रभाव दिसला नाही.वर्धा जिल्ह्यात बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालये सुरळीत सुरू होते. भीम आर्मीच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येऊन मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले. पुलगाव शहरात बसपाने मोर्चा काढून निवेदन दिले.भारत बंदला अमरावतीत अल्प प्रतिसाद मिळाला. विविध संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. दरम्यान, येथील इर्विन चौक ते जिल्हा कचेरीदरम्यान शासनविरोधात रॅली काढण्यात आली. भीम आर्मी, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, बहुजन समाज पार्टी, रिपाइं (गवई गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया यांच्यासह विविध दलित संघटनांनी शांततेत रॅलीद्वारे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन सादर केले. तसेच तिवसा, नांदगाव खंडेश्वरसह अन्य तालुकास्तरावरून दलित- आदिवासी संघटनांनी तहसीलदारांमार्फत शासनाकडे निवेदन पाठविले.गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात बंद पाळण्यात आला. मात्र या बंदची माहिती लोकांना पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. गडचिरोलीसह भामरागड, कोरची या आदिवासीबहुल भागात मोर्चे काढून निवेदन देण्यात आले. यात विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव व सडक-अर्जुनी तालुक्यात बंद पाळण्यात आला असतानाच तिरोडा तालुक्यातील ग्राम करटी बु. येथे खैरलांजी मार्गावर अनु.जाती-जमाती समाजबांधवांनी टायर जाळून विरोध दर्शविला. याशिवाय अन्य तालुक्यांत तहसीलदारामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. विशेष म्हणजे, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात बंद नसतानाच कोणत्याही संघटनेकडून निवेदनही देण्यात आले नसल्याचे कळले.भंडारा जिल्ह्यातील बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. लाखनीत टायर जाळून निषेध करण्यात आला. भंडारा, साकोली, पवनी, लाखांदूर, मोहाडी, तुमसर येथे दूचाकी रॅली काढून निषेध नोंदविण्यात आला. जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाला अॅट्रासिटी निर्णयासंबंधी निवेदन सोपविण्यात आले.